वृत्तसंस्था/ भोपाळ
सहाव्या इलाईट महिलांच्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या लवलिना बोर्गोहेन, निखत झरीन आणि मंजू राणी यांनी आपल्या वजन गटातून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.
येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत आसामचे प्रतिनिधीत्व करणाऱया लवलिनाने 75 किलो वजन गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत रेल्वेच्या मिना राणीचा तांत्रिक गुणावर पराभव करत शेवटच्या चार स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले. लवलिनाने ही लढत 5-0 अशा गुणफरकाने जिंकली. आता मध्यप्रदेशची जिज्ञासा रजपूत आणि लवलिना यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल. महिलांच्या 50 किलो वजन गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत निखत झरीनने गोव्याच्या तनिष्का चेवरचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. तेलंगणाच्या निखतचा उपांत्य फेरीचा सामना पोलीस दलाच्या शिवेंदर कौरशी होणार आहे. महिलांच्या 48 किलो वजन गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मंजू राणीने चंदिगडच्या सिमरनचा 5-0 असा पराभव केला. आता मध्यप्रदेशची अंजली शर्मा व मंजू राणी यांच्यात उपांत्य लढत होईल. 52 किलो गटात ज्योती, 63 किलो गटात शशी चोप्रा यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. या स्पर्धेमध्ये विविध राज्यांचे 302 स्पर्धक सहभागी झाले असून 12 विविध गटामध्ये लढती होत आहेत.