पालिकेने ताबडतोब दुरुस्ती करावी : शिरोडकर
प्रतिनिधी /मडगाव
मडगावच्या न्यू मार्केटच्या इमारतीला गळती लागली असून छपराच्या प्लास्टरचे तुकडेही गळतीमुळे गळून पडत आहेत. त्यामुळे दुकानदारांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. मडगाव पालिकेला विनंती आहे की, त्यांनी आवश्यक डागडुजी करून सदर समस्या सोडविण्यासाठी लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी न्यू मार्केट ट्रेडर्स संघटनेचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी केली आहे.
सदर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पावसामुळे ही गळती लागली आहे. वाऱयामुळेही पावसाचे पाणी व्हरांडय़ामध्ये साचत असल्याच्या पहिल्या मजल्यावरील दुकानदारांची तक्रारी आहेत. छपरावरील प्लास्टरचे तुकडे पाण्याने भिजल्याने गळून पडत आहेत. त्यामुळे येथे आवश्यक डागडुजी तातडीने करण्याची गरज आहे. पालिकेच्या मालकीची ही इमारत आहे. त्यामुळे पालिकेचे मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्षांनी यासंदर्भात तत्परतेने पावले उचलावीत, अशी मागणी शिरोडकर यांनी केली आहे.