बेळगाव : रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका रहिवासी तसेच वाहनचालकांना बसत आहे. गुड्सशेड रोड येथे रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या पाण्याच्या टाकीमधून दररोज शेकडो लिटर पाणी रस्त्यावर पसरत असून याचा फटका नागरिकांना बसत आहे. अनेकवेळा तक्रारी करूनदेखील रेल्वेकडून पाण्याच्या टाकीची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गुड्सशेड रोडवर पिटलाईन शेजारी पाण्याची टाकी आहे. अंदाजे 30 ते 40 फूट उंचावर असणाऱ्या या मोठ्या टाकीमध्ये पाण्याचा साठा केला जातो. रेल्वेची स्वच्छता करण्यासोबतच इतर कामांसाठी या टाकीमधील पाणी वापरले जाते. परंतु, या टाकीला गळती लागली असून ओव्हरफ्लो झालेले पाणी 30 ते 40 फुटांवरून रस्त्यावर पडते. गुड्सशेड रोडवरून दररोज शेकडो वाहने ये-जा करीत असतात. त्यामुळे ही वाहने व वाहनचालकांवर पाणी पडते. तसेच शेकडो लिटर पाणी वाया चालले आहे.
तक्रारी करूनदेखील दुर्लक्ष
परिसरातील काही नागरिकांनी रेल्वेकडे अनेकवेळा तक्रारी करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यावर्षी दुष्काळाची स्थिती असताना दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात असल्याने संताप व्यक्त होत आहे