एक युवती लाखो रुपयांची नोकरी सोडून ट्रकमध्ये वास्तव्य करत आहे. या ट्रकलाच तिने स्वत:चे घर केले आहे. या युवतीची नाव मॉली असून तिला नोकरीत उत्तम पगार मिळत होता, परंतु तरीही तिने नोकरी सोडून ट्रकमध्ये वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला. आता तिचे जीवन पूर्वीपेक्षा खूपच बदलले आहे. या जीवनाला ती अधिक चांगले मानत आहे. मॉलीसोबत तिचा पती अन् पाळीव श्वान देखील या ट्रकमध्येच राहत आहे.
2 वर्षांपूर्वी मी स्वत:ची कॉर्पोरेट नोकरी सोडली आणि उत्तर अमेरिकेच्या विविध ठिकाणी फिरण्यासाठी ट्रकमध्ये राहण्यास सुरुवात केली. लाखो रुपयांचा पगार असेल तर आनंदी होईन असे पूर्वी मला वाटायचे. नोकरी करताना एकप्रकारचा रिकामेपणा जाणवायचा असे मॉली सांगते.
आता ज्या ट्रकला तिने घराचे स्वरुप दिले आहे, त्यात किचन, बेडरुम आणि इतर काही सुविधा आहेत. आम्ही दोघांनी मिळून या ट्रकला घरात रुपांतरित केल्याचे तिने सांगितले आहे. मॉलीच्या या निर्णयावर लोक आता कॉमेंट करत आहेत. मुक्तपणे जीवन जगण्याचा हा निर्णय अत्यंत योग्य असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
मॉली सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय आहे, ती स्वत:च्या दैनंदिन जीवनाविषयी लोकांना सांगत असते. स्वत:ची नोकरी सोडण्याचा आणि प्रवास करण्याच्या निर्णयाबद्दल तिने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत सांगितले आहे. तिने टिकटॉकवर दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. यातील एका व्हिडिओत ती स्वत:च्या नोकरी सोडण्याच्या निर्णयाबद्दल सांगते, तर दुसऱ्या व्हिडिओत तिचे हे नवे घर दिसून येत आहे.