7 जागांसाठी 3 जून रोजी निवडणूक
प्रतिनिधी/ बेंगळूर
विधानपरिषदेच्या 7 सदस्यांचा कार्यकाळ जूनमध्ये संपुष्टात येणार असून रिक्त होणाऱया या जागांसाठी 3 जून रोजी निवडणूक होणार आहे. विधानपरिषदेच्या 7 जागांसाठी मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक वेळापत्रक जाहीर केले आहे. विधानसभेतील बलाबलाच्या आधारे भाजपचे 4, काँग्रेसचे 2 आणि निजदचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. निवडणूक घोषणा होताच सर्वच पक्षांमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी नेत्यांनी ‘गॉडफादर’मार्फत वरिष्ठांवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
विधानसभेवरून विधानपरिषदेवर निवडणूक आलेले लक्ष्मण सवदी, आर. तिम्मापूर, अल्लम विरभद्रप्पा, एच. एम. रमेशगौडा, वीणा अच्चय्या, नारायणस्वामी के. व्ही. आणि लेहरसिंग शिरोया यांचा कार्यकाळ 14 जून 2022 रोजी संपुष्टात येणार आहे. या 7 जागांसाठी निवडणूक वेळापत्रक जाहीर झाले असून 17 मे रोजी अधिसूचना जारी होणार असून त्याच दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होईल. अर्ज दाखल करण्याची अंमित मुदत 25 मे असून 27 मेपर्यंत माघार घेता येणार आहे. 3 जून रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत मतदान होईल. त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. विधानसभेचे आमदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत.
कर्नाटक विधानपरिषदेची एकूण सदस्यसंख्या 75 आहे. त्यामध्ये भाजपच्या 37, काँगेसचे 26 आणि निजदच्या 10 सदस्यांचा समावेश आहे. 14 जून रोजी कार्यकाळ संपत असलेल्या 7 विधानपरिषद सदस्यांमध्ये काँग्रेसचे तीन, भाजप आणि निजदचे प्रत्येकी दोन सदस्य आहेत. विधानसभेतील पक्षीय बलाबल विचारात घेतल्यास भाजपला चार, काँग्रेसला दोन आणि निजदला एक जागा मिळू शकते.
विजयासाठी 33 आमदारांची मते आवश्यक
विधानसभेमध्ये भाजपकडे 119 आमदार आहेत. तर काँग्रेसकडे 69, निजदकडे 32, बसप आणि अपक्ष प्रत्येकी 1 आमदार आहे. त्याचप्रमाणे सभाध्यक्ष आणि एक नामनिर्देशित सदस्य आहे. विधानपरिषद निवडणुकीत एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी किमान 33 आमदारांची मते मिळणे आवश्यक आहे. 7 पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असतील तर निवडणूक घ्यावी लागेल. अन्यथा उमेदवारांची निवड बिनविरोध होईल.