आमदार रमेश जारकीहोळी यांचा विश्वास : गोकाकमध्ये भाजपचा प्रचार
बेळगाव : महिलांनी गृहलक्ष्मी योजनेच्या भरवशावर राहू नये. कारण लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपचे सरकार येणार आहे. त्यानंतर केवळ मोदी यांच्याच योजना सुरू राहतील. मागील वेळी गोकाक मतदारसंघातून भाजप उमेदवाराला 50 हजारांची आघाडी मिळाली होती. यावेळी जगदीश शेट्टर यांना 1 लाख मतांची आघाडी मिळेल, असा विश्वास गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केला. भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी सोमवारी गोकाक तालुक्यात जोरदार प्रचार केला. अंकलगी येथे झालेल्या प्रचारफेरीला हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. रमेश जारकीहोळी व जगदीश शेट्टर यांच्या उपस्थितीत गोकाक येथील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना जगदीश शेट्टर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी बेळगावमध्ये जाहीर सभा झाली. सभेला लाखोंची उपस्थिती असल्याने काँग्रेसला हादरा बसला आहे. देशात मजबूत सरकारसाठी मोदींच्या नेतृत्वाची गरज आहे. कै. सुरेश अंगडी यांनी गोकाक तालुक्याला भरभरून निधी दिला. 30 वर्षांपासून माझेही गोकाक तालुक्याशी ऋणानुबंध आहेत. सभापती असताना शेतकऱ्यांच्या अनेक समस्या सोडविल्यामुळे गोकाक तालुका माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकेल, असे शेट्टर यांनी सांगितले. बेळगाव मतदारसंघासाठी लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. सहा वेळा आमदार, मुख्यमंत्री, मंत्री, विधानसभा अध्यक्ष असा अनुभव असणारे जगदीश शेट्टर उमेदवार म्हणून मिळाले आहेत. अशा अनुभवी व्यक्तीला खासदार म्हणून संसदेत पाठविणे योग्य ठरेल, असे विधानपरिषद माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, राजेंद्र गौडप्पगोळ यासह इतर उपस्थित होते.