वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाचा एक भाग म्हणून अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय नागरिकांनी न्यूयॉर्कमध्ये पहिली आंतरराष्ट्रीय लिबर्टी चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंडियन डायस्पोरा संघाने ऑस्ट्रेलिया डायस्पोरा संघाचा पराभव करत लिबर्टी चषकावर आपले नाव कोरले.
अमेरिकेत क्रिकेटचा प्रसार मोठय़ा प्रमाणात करण्याच्या हेतूने अमेरिकेतील भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दूतावास प्रमुखांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. क्रिकेट खेळणाऱया देशांना एकत्रित आणून या क्रीडा प्रकाराचा अमेरिकेत झपाटय़ाने प्रसार व्हावा या हेतूने सदर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावास प्रमुख कार्यालयातर्फे भारताचे प्रतिनिधीत्व न्यूयॉर्क थंडरबोल्टस् क्रिकेट क्लबने केले होते. तर ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व न्यूयॉर्क कूकाबुराज क्रिकेट क्लबने केले. अमेरिकेतील भारतीय दूतावासाचे प्रमुख रणधीर जसवाल यांनी सदर स्पर्धेचा हेतू मोठय़ा प्रमाणात यशस्वी झाल्याचे प्रतिपादन केले. या स्पर्धेने ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील मैत्रीचे संबंध अधिक दृढ केले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व जॅक लिस्ट यांच्याकडे सोपविण्यात आले होते तर भारतीय संघाचे नेतृत्व राज मोहाबे यांनी केले होते. या सामन्यात विंडीजचे स्टीव्ह बकनर आणि रमेश लाल हे पंच होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 146 धावा जमविल्या. त्यानंतर भारताने 16 षटकात विजयाचे उद्दिष्ट गाठले. भारतीय संघातील सँटी संतोषने आक्रमक फलंदाजी करताना 6 षटकार आणि 3 चौकारासह 48 चेंडूत 81 धावा झोडपल्या.