पुणे / प्रतिनिधी :
नालासोपारा येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा मृतदेह बॅगेत भरून पुणे-मुंबई लोहमार्गावरील तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकावर फेकून दिल्याप्रकरणी तीन जणांना विशेष न्यायाधीश जे. जी. डोलारे यांच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने दिलेल्या शिक्षेत आरोपींना सामूहिक बलात्कार प्रकरणात मरेपर्यंत जन्मठेप, अपहरणप्रकरणी पाच वर्ष कैद, पुरावे नष्ट केल्याप्रकरणी तीन वर्ष कैद व प्रत्येकी 25 हजार रुपयांचा दंड सुनावला आहे.
राहुल रवींद्र बरई (वय 29), ईशान हमजान अली कुरेशी (29) व संतोष विष्णू जुगदर (29, तिघे रा. वडाळा, मुंबई) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनवर एका लाल रंगाच्या बॅगेत पोलिसांना मुलीचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता आरोपींपैकी संतोष जुगदर या मुलासोबत तिचे प्रेमसंबंध होते. संतोष गुन्हेगार होता. त्याच्यावर खून, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने सदर मुलीस त्याचा मित्र राहुल याच्या घरी नेले. त्याठिकाणी आरोपींनी मुलीस आर्थिक व्यवहाराच्या गुन्हय़ात मदत करण्यास सांगितले. परंतु त्यास मुलीने नकार दिला. त्यामुळे तीन आरोपींनी संगनमताने तिच्यावर बलात्कार करून ओढणीने गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह नष्ट करण्यासाठी तो एका बॅगेत भरला. कॅबने सदर मृतदेह मुंबईतील सायन रेल्वे स्थानकावर आणला. तेथून आरोपी तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकावर आले. त्यानंतर त्यांनी मृतदेह असलेली बॅग त्याठिकाणी आडबाजूला सोडून पळ काढला होता.