अबकारी खात्याची करवाई : सोलापूरच्या वाहन चालकाला अटक : दारूचे 452 बॉक्स हस्तगत
खानापूर : बेळगाव जिल्हा अबकारी उपायुक्त व खानापूर अबकारी पथकाने जांबोटी-खानापूर रस्त्यावर मोदेकोप येथे संशयित वाहनाला थांबवून तपासणी केली असता 47 लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. खानापूर येथील अबकारी कार्यालयाच्या आवारात आणून वाहनाची संपूर्ण तपासणी केली असता त्यामध्ये 452 बॉक्स गोवा बनावटीचे मद्य आढळून आले. या मद्याची किंमत 47 लाख असून वाहनाची किमत 20 लाख 37 हजार आहे. या प्रकरणी वाहन चालक चंद्रकांत शेरे (राहणार सोलापूर) याला अटक करण्यात आली आहे. गोवा येथून विनापरवाना मद्य वाहतूक करत असल्याची माहिती बेळगाव जिल्हा अबकारी आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने खानापूर अबकारी खात्याला सूचना केली. त्यानुसार वाहनावर देखरेख ठेवण्यात आली होती. खानापूर-जांबोटी रस्त्यावरील मोदेकोप येथे संशयित वाहन क्रमांक जी. जे. 10-टी. टी. 8276 या वाहनास थांबवून तपासणी केली असता विनापरवाना गोवा बनावटीचे मद्य वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून आले. खानापूर अबकारी कार्यालयाच्या आवारात वाहनाची संपूर्ण तपासणी केली असता त्यात 452 बॉक्स मद्य जप्त करण्यात आले. या मद्याची किमत 47 लाख रुपये आहे. वाहनचालक चंद्रकांत शेरे याला अटक केली असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली. ही कारवाई बेळगाव जिल्हा अबकारी आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ तसेच बेळगाव जिल्हा अबकारी सहआयुक्त यांच्या निदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती अबकारी उपायुक्त एम. वनजाक्षी यांनी दिली. निवडणुका तेंडावर आल्याने अबकारी खाते सतर्क झाले आहे. निवडणुकीसाठीच मद्य साठवणूक करण्यात येत असल्याचा संशय बेळगाव जिल्हा विभागीय उपायुक्त एम. वनजाक्षी यांनी सांगितले. या कारवाईत बेळगाव जिल्हा अबकारी आयुक्त डॉ. मंजुनाथ, विभागीय आयुक्त फिरोजखान किल्लेदार, बेळगाव विभागीय उपआयुक्त रवी मुडगोड, खानापूर अबकारी खात्याचे निरीक्षक दावलसाब शिंदोगी, प्रकाश डोणी, जयराम हेगडे यांचा सहभाग होता.