बेळगाव– बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात शुक्रवारी रात्री लॉकअप डेथची घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली असून गांजा प्रकरणी चौकशीसाठी आणलेल्या बेल्लद बागेवाडी येथील इसमाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी संशयाच्या भोवर्यात अडकले आहेत.
बसनगौडा यल्लनगौडा पाटील (वय 45) रा. बेल्लद बागेवाडी, ता. हुक्केरी असे त्याचे नाव आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी ऑगस्टमध्ये दाखल झालेल्या गांजा प्रकरणी शुक्रवारी दुपारी बेल्लद बागेवाडी येथे त्याला अटक केली होती. पोलीस स्थानकात आणून चौकशी करताना हि घटना घडली आहे.
घटनेची माहिती समजताच पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, उपायुक्त रविंद्र गडादी, मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमणी, गुन्हे तपास विभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ आदींसह वरिष्ठ अधिकारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. रात्री बेल्लद बागेवाडी येथील बसनगौडाची पत्नी व मुलीला बोलावून घेण्यात आले.
रात्री 11.40 वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय विभागातून मृतदेह शवागारात पाठविण्यात आला. रात्री उशिरापर्यंत यासंबंधी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्तांनी एका पत्रकाद्वारे यासंबंधी माहिती दिली आहे. अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात बसनगौडाला अटक करण्यात आली होती. बेल्लद बागेवाडीहून बेळगावला येताना काकतीजवळ तो अत्यवस्थ झाला. त्यामुळे स्थानिक डॉक्टरांकडे नेण्यात आले. औषधोपचारानंतर त्याला बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात नेण्यात आले. चौकशी करताना पुन्हा त्याचे आरोग्य खालावले. त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रात्री त्याचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.
मध्यरात्री पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी हि या घटनेसंदर्भात पत्रकारांना माहिती दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात येणार आहे. पोलिसांचा हलगर्जीपणा आढळून आल्यास त्यांच्यावरहि कारवाई करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
शुक्रवारी रात्री यासंबंधीची माहिती सर्वत्र पसरली. काँग्रेसचे नेते मलगौडा पाटील, प्रदीप एम. जे., भ्रष्टाचार निर्मूलन परिवाराचे सुजित मुळगुंद आदींसह विविध संघटनांचे कार्यकर्ते सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात दाखल झाले. हे प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची कुणकुण लागल्यामुळे मध्यरात्री पोलीस आयुक्तांची भेट घेण्यात आली. उपलब्ध माहितीनुसार बसनगौडावर बैलहोंगल व चिकोडी पोलीस स्थानकातहि अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. ऑगस्टमध्ये तो कारागृहात असताना त्याच्यावर बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला होता. त्यानंतर तो जामिनावर बाहेर पडला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी शुक्रवारी त्याला अटक झाली. त्यावेळी हा प्रकार घडला आहे.
Previous Articleकेएलई हॉस्पिटलमध्ये बालकांवर शस्त्रक्रिया यशस्वी
Next Article केएलईमध्ये आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषद