शिरशिंगे परिसरात भीतीचे वातावरण
ओटवणे प्रतिनिधी
शिरशिंगे धोंडवाडीत लंपी सदृश आजाराची बैलाला लागण झाल्यामुळे खळबळ उडाली असून शिरशिंगे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान याबाबत शिरशिंगे उपसरपंच सचिन धोंड यांनी पशुसंवर्धन विभागाचे लक्ष वेधल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ जाधव यांनी याची तात्काळ दखल घेत या बैलाचे रक्त नमुने घेतले. तसेच या बैलांसह सोबतच्या तीन गुरांना प्रतिबंधात्मक लस दिली आहे.
शिरशिंगे धोंडवाडी येथील येथील वसंत न्हानू धोंड यांच्या लहान बैलाला ताप येत असून अंगावर चट्टे उमटले आहेत. लंपी सदृश्य हा आजार आहे. या आजारामध्ये वेळेवर उपचार झाले नाही तर गुरे दगावण्याचा संभव असतो. त्यामुळे शिरशिंगे उपसरपंच सचिन धोंड यांनी खबरदारीचा उपाय म्हणून पशुसंवर्धन विभागाला कळविले. त्यानंतर पशु विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केली.
सध्या महाराष्ट्रामध्ये गुरांना होणाऱ्या लंपी आजाराने थैमान घातले आहे. या आजारामुळे हजारो गुरे दगावत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अनेक ठिकाणी गुरांना लंपी आजाराचा प्रादुर्भाव होत अनेक गुरे दगावली आहेत. अशा परिस्थितीत शिरशिंगे धोंडवाडीत बैलाला लंपी सदृश्य आजार झाल्याने या भागातील शेतकऱ्यांमधे भितीचे वातावरण आहे.