प्रतिनिधी /बेळगाव
महाद्वार रोड परिसरातील रस्त्यांची दूरवस्था झाली असून संपूर्ण महाद्वार रोड खड्डेमय बनला आहे. विशेषतः येथील तिसरा क्रॉस येथे डेनेजवाहिन्या घालण्यासाठी खोदाई केल्याने रस्त्याच्या मध्यभागी भली मोठी चर निर्माण झाली आहे. यामध्ये वाहने अडकण्याचे प्रकार वाढले असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
महाद्वार रोड मुख्य रस्त्यावर ड्रेनेजवाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आली होती. मात्र, या रस्त्याची दुरुस्ती झालीच नाही. केवळ पॅचवर्क करून नाममात्र दुरुस्ती काम करण्यात आले. त्यामुळे सध्या हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय बनला आहे. पावसामुळे खड्डय़ांचा आकार वाढला असून वाहनधारकांना डोकेदुखीचे बनले आहे. महाद्वार रोड तिसरा क्रॉस या रस्त्यावर डेनेजवाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आली होती.
पावसाच्या तोंडावर हे काम करण्यात आल्याने रस्त्याचे पुनर्डांबरीकरण करण्यात आले नाही. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या चरीमध्ये खडी घालण्यात आली होती. पण खडीमुळे वाहने घसरून पडण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे यावर माती टाकण्यात आली होती.
मात्र, सध्या ही चर वाहनधारकांना धोकादायक बनली असून दुचाकी वाहनधारक घसरून पडत आहेत. चार चाकी वाहने अडकत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे रस्त्याची दुरुस्ती करणे अशक्मय आहे. पण पावसाचे पाणी खड्डय़ांमध्ये साचून वाहनधारकांना अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.