वृत्तसंस्था/ कॉर्सियर सूर व्हेव (स्वीस)
भारताची महिला मल्ल अंतिम पांघलचे 2022 सालातील युनायटेड विश्व कुस्ती फेडरेशनच्या सर्वोत्तम युवा मल्ल पुरस्कारासाठी नामांकन झाले आहे. पांघलने गेल्या ऑगस्टमध्ये झालेल्या 20 वर्षाखालील वयोगटाच्या विश्व कुस्ती स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.
2022 च्या हंगामात अंतिम पांघलने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी केली आहे. तत्पूर्वी 44 व्या कनिष्ठांच्या विश्व कुस्ती स्पर्धेत भारताच्या 6 मल्लांनी आपल्या वजनगटातून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. एकालाही सुवर्णपदक मिळू शकले नाही. पण भारताच्या अंतिम पांघलने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आपल्या देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते. या स्पर्धेत तिने जपानच्या कनिष्ठ युरोपियन चॅम्पियन आयाका तिमुराचा पराभव केला होता. तसेच तिने त्यानंतरच्या लढतीत जर्मनीच्या ऍमोरी ओलिव्हावर 11-0 अशी एकतर्फी मात केली होती. 53 किलो वजन गटातील अंतिम लढतीत पांघलने कझाकस्तानच्या शेगाएव्हाचा पराभव करत पराभव केला होता. 20 वर्षाखालील वयोगटाच्या युरोपियन चॅम्पियन्सशिप स्पर्धेत युक्रेनच्या नातालिया क्लिव्हेचुस्काने कास्यपदक मिळवले होते. पांघलने युक्रेनच्या नातालियालाही पराभूत केले होते.
अंतिम पांघलने 2022 च्या हंगामात विविध वयोगटातून चार आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये आपला सहभाग दर्शवताना 16 लढती जिंकल्या तर एका लढतीत पराभव स्वीकारला होता. पांघलने 20 वर्षाखालील वयोगटाच्या विश्व कुस्ती स्पर्धेत तसेच 20 वर्षाखालील वयोगटाच्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत आणि वरिष्ठ गटातून मानांकन कुस्ती स्पर्धेत तिने सुवर्णपदके मिळवली.
2022 च्या युनायटेड विश्व कुस्ती संघटनेतर्फे सर्वोत्तम युवा महिला मल्ल पुरस्कारासाठी 5 मल्लांची शिफारस करण्यात आली आहे. या यादीत जपानची ओझाकी, अमेरिकेची इलोर, स्वीडनची मालमेग्रन, रुमानियाची ऍना आणि भारताची अंतिम पांघल यांची शिफारस करण्यात आली आहे.