Bharat Jodo Yatra : राजस्थानातील एक प्रभावशाली गुर्जर नेते विजय सिंग बैंसला ( Vijay sing Bainsla ) यांनी सचिन पायलट ( Sachin Pilot ) यांना मुख्यमंत्री करण्याची त्यांची मागणी मान्य न केल्यास 3 डिसेंबरला राजस्थान राज्यात सुरवात होणाऱ्या भारत जोडो यात्रेला विरोध करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे राहुल गांधींची ( Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेला ( Bharat Jodo Yatra ) राजस्थानमध्ये अडचणींचा सामना कराावा लागण्याची शक्यता आहे.
राजस्थानमधील दौसा येथे पत्रकारांशी बोलताना गुर्जर नेते विजय सिंग बैंसला म्हणाले, “राजस्थानमधील काँग्रेस सरकारला चार वर्षे पूर्ण झाली असून अजून एक वर्ष बाकी आहे. शेवटच्या वर्षी सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करावे. जर कॉंग्रसच्या नेत्यांनी सचिन पायलट यांना मुख्यमंत्री केले तर राहुल गांधी यांचे राजस्थानमध्ये स्वागत आहे अन्यथा या यात्रेला राजस्थानात तिव्र विरोधाला सामोरे जावे लागेल.” यासह गुर्जर समाजाचे इतर प्रलंबित प्रश्न लवकर सोडवण्याची मागणीही बैंसला यांनी पक्षाकडे केली.
भारत जोडो यात्रा थांबवण्यासाठी गुर्जर आरक्षण संघर्ष समितीचे नेते बुधवारपासून मैदानात उतरणार असल्याचे गुर्जर यांनी सांगितले. बैंसला यांनी राज्यात येणाऱ्या भारत जोडो यात्रेला रोखण्याची धमकी देण्याची ही दुसरी वेळ आहे.