वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना सीबीआयने सोमवारी दुपारी राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांच्या कोठडीबाबत निर्णय दिला. राऊस ऍव्हेन्यू न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. त्यानुसार आता ते 4 मार्चपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार आहेत. सिसोदिया यांना न्यायालयात हजर केल्यानंतर सीबीआयने पाच दिवसांची कोठडी मागितली होती, ती न्यायालयाने मान्य केली.
दिल्लीतील बहुचर्चित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात सिसोदिया यांची रविवारी सीबीआय मुख्यालयात करण्यात आली. जवळपास आठ तास चाललेल्या चौकशीत त्यांचा सहभाग असल्याचे धागेदोरे सापडल्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. सीबीआय अधिकाऱयांच्या जबानीला सकारात्मक प्रतिसादही त्यांच्याकडून मिळत नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळेच सीबीआयने त्यांच्या चौकशीसाठी रिमांड आवश्यक असल्याचा युक्तिवाद न्यायालयात मांडत पाच दिवसांची कोठडी मागून घेतली आहे. आता सीबीआय कस्टडीमध्ये त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे.
सीबीआयने मागितलेल्या मनीष सिसोदिया यांच्या कोठडीला त्यांचे वकील दयान कृष्णा यांनी विरोध केला. रिमांड मागण्याचे कोणतेही कारण नसून तपासात असहकार्याचे आरोप निराधार असल्याचेही ते म्हणाले. लेफ्टनंट गव्हर्नरच्या मंजुरीनंतर कमिशनमध्ये वाढ करण्यात आली आहे. एलजींना माहिती देऊनच धोरण ठरविण्यात आले असून त्यात पारदर्शकता ठेवण्यात आल्याचा युक्तिवाद सिसोदिया यांच्या वकिलाने केला. तसेच सिसोदिया प्रत्येक नोटीसवर सीबीआयसमोर हजर झाल्याचेही त्यांनी सांगितले. सिसोदिया यांच्यावतीने न्यायालयात तीन वकील उपस्थित होते. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर राऊस एव्हेन्यू कोर्टाने मनीष सिसोदिया यांच्या सीबीआयच्या कोठडीच्या मागणीवरील निर्णय काही काळासाठी राखून ठेवला. मात्र, सायंकाळच्या सुमारास त्यांची पाच दिवसांसाठी सीबीआय कोठडीत रवानगी करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. तत्पूर्वी सोमवारी दुपारी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.
कारवाईवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप
आम आदमी पार्टीचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही मनीष सिसोदिया यांच्या अटकेचा निषेध केला आहे. बहुतेक सीबीआय अधिकारी मनीषच्या अटकेच्या विरोधात असताना राजकीय दबावामुळे त्यांना अटक झाल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत केला आहे. सिसोदिया यांच्याबाबत प्रत्येकाला आदर असून त्यांच्याविरोधात कोणतेही सबळ पुरावे नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, भाजपने मनीष सिसोदिया यांच्या अटकेच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.