वृत्तसंस्था / चेन्नई
तामिळनाडूत 15 माजी आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. हे नेते प्रामुख्याने अण्णा द्रमुकचे आहेत. त्यांनी दिल्लीत येऊन पक्षाच्या मुख्यालयात प्रक्षप्रवेश केला. भारतीय जनता पक्षाच्या तामिळनाडू शाखेचे अध्यक्ष के. अण्णामलाई आणि केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या उपस्थितीत बुधवारी हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. माजी आमदारांचे स्वागत करण्यात आले.
के. वादीवेल, एम. व्ही. रत्नम, आर. चिन्नास्वामी, पी. एस. कंडासामी अशी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्यांपैकी काही आमदारांची नावे आहेत. नेत्यांना पक्षप्रवेशामुळे तामिळनाडूत भाजपचा प्रभाव वाढणार आहे. या आमदारांच्या अनुभवाचा उपयोग पक्षाला राज्यात आपला विस्तार करण्यासाठी निश्चितच होईल. तामिळनाडूत राजकीय वाऱ्याची दिशा परिवर्तित होत आहे, हे या पक्षप्रवेशामुळे स्पष्ट होत आहे. प्रतिदिन अनेक कार्यकर्ते आणि नेते भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत, अशी भलावण या प्रसंगी अण्णामलाई यांनी केली आहे.
भाजपकडे राज्य आकर्षित
तामिळनाडू राज्यातील जनता आता द्रविडी पक्षांच्या नकारात्मक राजकारणाला कंटाळली असून जनतेला परिवर्तन हवे आहे. राज्यातील जनता मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाकडे आकर्षित होत असून आगामी काळात या परिवर्तनाचे प्रत्यक्ष प्रत्यंतर आल्यावाचून राहणार नाही, असे अण्णामलाई यांनी स्पष्ट केले