शववाहिकेतून आली नववधू
एका जोडप्याने विवाहासाठी निवडलेले स्थळ जाणून घेतल्यावर चकित व्हाल. या जोडप्याने स्वतःच्या जीवनातील सर्वात विशेष क्षणाला अशा ठिकाणी साजरा करण्याचा निर्णय घेतला, जेथे सर्वसाधारणपणे लोक दुःखात पोहोचत असतात. या जोडप्याने दफनभूमी परिसरात विवाह केला आहे.
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील रीडली येथे राहणाऱया 27 वर्षी नोर्मा निनोने 29 वर्षीय एक्सेलसोबत विवाह केला आहे. विवाहासाठी नोर्मा हे शववाहिकेतून पोहोचली होती. या दोघांनी शवपेटय़ांनी वेढलेल्या ठिकाणी विवाह केला आहे. सर्वसाधारणपणे अमेरिकेत विवाहासाठी वधू पांढरा पोशाख परिधान करत असते. परंतु या अनोख्या विवाहासाठी नोर्माने काळा पेहराव केला होता. विवाहसोहळय़ासाठी उपस्थित बहुतांश लोक या अनोख्या वेडिंग थीमला पाहून चकित झाले. परंतु शवपेटी तयार करण्याचे काम करणाऱया नोर्माने या विवाहाला ‘परफेक्ट’ ठरविले आहे.
दफनभूमीतच मला विवाह करायचा होता. ही शहरातील पहिली अशी दफनभूमी आहे जी महिलांकडून संचालित केली जाते. हे ठिकाण माझ्या जीवनातील महत्त्वाचा हिस्सा आहे, कारण मी येथे कित्येक वर्षांपर्यंत काम केले आहे. हॅलोवीन-थीम वेडिंग माझ्यासाठी परफेक्ट असल्याचे नोर्माने महटले आहे.
माझे कुटुंबीय अंधश्रद्धाळू असल्याने प्रारंभी ते अशाप्रकारच्या विवाहाबद्दल घाबरून गेले होते. परंतु या सर्व लोकांनी वेगळय़ा विवाहसोहळय़ाचा आनंद घेतला असल्याचे नोर्माने सांगितले. विवाहासाठी नोर्माने सर्व पाहुण्यांना 1930 च्या दशकाच्या स्टाइलचा पेहराव करून येण्यास सांगितले होते.
नोर्मा आणि एक्सेल यांनी प्रारंभी योजमाइट नॅशनल पार्कमध्ये विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु नोर्माकडे दुसरी योजनाही तयार होती. एक्सेल प्रारंभी दुसऱया ठिकाणाबद्दल तयार नव्हता. परंतु नोर्माने समजूत काढल्यावर दफनभूमीत विवाह करण्याची तयारी त्याने दर्शविली होती.