उंब्रज/ प्रतिनिधी
तासवडे तालुका कराड येथील औद्योगिक वसाहतीतील किर्लोस्कर कंपनीच्या प्लांटच्या पाठीमागे आवारात बुधवारी सकाळी अचानक आग लागली. वाऱ्याचा वेग असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट निर्माण झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुमारे दहा-पंधरा मिनिटात आगीने रौद्ररूप धारण केल्याने येथे मोठ्या प्रमाणावर आग भडकली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपदा जळून खाक झाली आहे. तसेच किर्लोस्कर कंपनीच्या काही जुन्या स्पेअर पार्टनाही आगीची झळ बसली आहे. आग लागल्याचे समजताच तळबीड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहून वरोटे यांनी पोलीस फाट्यासह कंपनीच्या आवारात धाव घेऊन आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. कराड येथील अग्निशामक दलाचा बंब बोलून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान आग नेमकी कोणत्या कारणाने लागली यामागचे कारण समजू शकले नाही. मात्र यावेळी पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक होत आहे.