महापौर-उपमहापौरांची मुदत संपुष्टात आली असून निवडणूक घेण्यासाठी प्रादेशिक आयुक्तांनी महापालिका प्रशासनाला आदेश दिला आहे. सोमवार दि. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे. यामुळे निवडणुकीच्या तारखेची प्रतीक्षा संपली असून याबाबत नगरसेवकांना निवडणुकीची नोटीस जारी करण्याचा आदेश दिला आहे.
प्रादेशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 21 व्या कार्यकालावधीकरिता महापौर-उपमहापौर निवडणूक होणार आहे. महापौर-उपमहापौर निवडणूक होऊन दि. 6 सप्टेंबर रोजी एकवर्षाचा अवधी पूर्ण झाला आहे. महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी तब्बल सव्वा वर्षाची प्रतीक्षा करावी लागली असून संभ्रमाच्या वातावरणात अखेर महापौर-उपमहापौर निवडणुकीची घोषणा शुक्रवारी प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांनी केली आहे. नगरविकास खात्याने 21 व्या कार्यकालावधीसाठी जाहीर केलेल्या आरक्षणानुसार निवड प्रक्रिया होणार आहे. महापौरपद सामान्य महिला आणि उपमहापौरपद मागासवर्गीय ‘ब’ महिलेकरिता राखीव आहे. महापौर निवडणूक दि. 31 जानेवारी रोजी घेण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र ऐनवेळी यामध्ये बदल करून दि. 6 फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्याची घोषणा प्रादेशिक आयुक्तांनी केली आहे. सातव्या सभागृहाची स्थापना होणार असून 21 व्या कार्यकालावधीकरिता महापौर-उपमहापौरांची निवड होणार आहे.
यावर प्रादेशिक आयुक्तांनी शुक्रवारी शिक्कामोर्तब केले असून निवडणुकीच्या नोटिसा नगरसेवकांना पाठविण्याची सूचना महापालिकेच्या कौन्सिल विभागाला करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र महापौर-उपमहापौर निवडणुकीबाबत महापालिकेच्या कौन्सिल विभागाला कोणतीच माहिती उपलब्ध झाली नव्हती. महापौर-उपमहापौर निवडणुकीबाबत महापालिकेचे कौन्सिल विभाग अनभिज्ञ आहेत.
निवडणूक प्रक्रियेला वेग
दि. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवधी देण्यात आला आहे. दुपारी 1 वाजता सभागृहाच्या बैठकीस प्रारंभ होऊन माघारीची प्रक्रिया व निवड प्रक्रिया पार पडणार आहे. आरक्षणाची घोषणा फेब्रुवारी 2019 मध्ये झाली होती. मात्र महापालिका निवडणुका होण्यास विलंब झाल्याने आतापर्यंत 22, 23 आणि 24 व्या कार्यकालावधीच्या महापौर-उपमहापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. पण याबाबत प्रादेशिक आयुक्तांनी नगरविकास खात्याला पत्र पाठवून स्पष्टीकरण विचारले होते. त्यामुळे 21 व्या कार्यकालावधीच्या आरक्षणानुसार महापौर-उपमहापौर निवड करण्याचे स्पष्टीकरण नगरविकास खात्याने दिले आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे.
महापौरपदी वर्णी लागण्यासाठी जोरदार लॉबिंग
महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे महापालिकेत 58 पैकी भाजपचे संख्याबळ 40 आहे. तर उर्वरित नगरसेवक काँग्रेस आणि अपक्ष आहेत. भाजपकडे बहुमत असल्याने महापालिकेत भाजपचा महापौर होणार हे निश्चित आहे. मात्र महापौरपदासाठी भाजपमधील दोन नगरसेविका इच्छुक आहेत. दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही विभागामधील नगरसेविकास असून महापौरपदी वर्णी लागण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.