प्रतिनिधी /बेळगाव
राणी चन्नम्मा चौक ते खडक गल्ली कॉर्नरपर्यंतच्या काकतीवेस रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र सुस्थितीत असलेल्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आल्याने तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे शनिवार खूट ते राणी चन्नम्मा चौकपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी मंगळवारी मोजमाप करण्यात आले.
काकतीवेस रस्त्याची दुरवस्था झाली असून मुख्य मार्ग असल्याने मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. तसेच मिरवणुकीचा मार्ग असल्याने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली होती. पण तात्पुरती डागडुजी करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. तसेच राणी चन्नम्मा चौक ते खडक गल्ली कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. पण हा रस्ता सुस्थितीत असून खडक गल्ली कॉर्नर ते शनिवार खूटपर्यंतचा रस्ता खूपच खराब झाला आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे आणि चरी निर्माण झाल्याने वाहनधारकांना आणि व्यावसायिकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. याची दखल घेऊन शनिवार खूट ते राणी चन्नम्मा चौकापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या दृष्टीने मंगळवारी सकाळी मोजमाप करण्यात आले. लवकरच या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱयांनी दिली.