क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
एफसी गोवाने स्पेनचा फुटबॉलपटू एदू बेडिया याला आणखी एका हंगामासाठी कायम ठेवले आहे. गेल्या आयएसएल फुटबॉल मोसमात एफसी गोवाचे कप्तानपद भुषविलेल्या एदूचे या संघासाठीचे सहावे वर्ष आहे.
एदू बेडिया 2017-18 फुटबॉल हंगामापासून एफसी गोवाचे प्रतिनिधीत्व करत आहे. मागील पाच हंगामात या स्पेनच्या मीडफिल्डरने 102 सामने खेळताना 13 गोल केले आहेत तसेच तेवढेच गोल करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. करारात वाढ केल्यामुळे एदू बेडियाने एफसी गोवा संघ व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत.
2017 पासन एफसी गोवा हे माझे घर बनले आहे. माझ्या आजवरच्या कारकिर्दीत या क्लबचे मोठे स्थान आहे. त्यामुळे एफसी गोवाकडे मी क्लब म्हणून पाहत नाही. क्लबसह पदाधिकारी, सपोर्ट स्टाफ, सहकारी खेळाडू तसेच चाहते हे माझ्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनले आहेत. एफसी गोवासोबत आणखी एक हंगाम खेळता येणार असल्याचा मोठा आनंद आहे, असे बेडियाने कराराच्या पूर्ततेनंतर बोलताना सांगितले.
एफसी गोवाचे प्रतिनिधीत्व करताना क्लबसाठीचे काही महत्वपूर्ण विजय आणि जेतेपद यात सहभागी असल्याचा मोठा आनंद आहे. प्रत्येक हंगाम हा त्या त्या क्लबसह प्रत्येक खेळाडूसाठी वेगळा असतो. आगामी हंगाम एफसी गोवासाठी संस्मरणीय ठरावा. आयएसएल लीगमध्येही गोवा संघ अव्वल संघांत राहील, असा आपल्याला विश्वास आहे. संघाला कायम विजय मिळवून देण्यात टीमला टॉप टीममध्ये ठेवण्यात मी सर्वतोपरी योगदान देईन, असे एदू बेडिया म्हणाला.
गेले पाच हंगाम एदू बेडिया एफसी गोवासाठीचा महत्वपूर्ण घटक राहिला आहे. क्लबची ध्येय-धोरणे आणि फिलॉसॉफीशी त्याने स्वतःला चांगले जुळवून घेतले आहे. मागील दोन हंगामात तो एफसी गोवाचा प्रमुख खेळाडू म्हणून आहे. त्याने त्याची योग्यता आणि उपयुक्तता सिद्ध केली आहे. यंदाच्या हंगामात एफसी गोवाने कोचिंग आणि सपोर्ट स्टाफमध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे पुढील हंगामात बेडिया याचा संघातील समावेश आमच्यासाठी महत्वपूर्ण असेल, असे एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुष्कर म्हणाले.
एक अनुभवी खेळाडू म्हणून आम्हाला एदू बेडियाकडून खूप अपेक्षा आहेत. तो नवोदित खेळाडूंना मागदर्शन करेल व त्याशिवाय त्याचा अनुभव सांघिक खेळ उंचावण्यासाठी जमेची बाजू ठरेल, असे रवी पुष्कर म्हणाले.
मागील आयएसएल फुटबॉलच्या हंगामात एफसी गोवाची कामगिरी लौकिकाला साजेशी झाली नाही. पुढील हंगामासाठी नवी व्युहरचना करताना कोचिंग आणि सपोर्ट स्टाफमध्ये बदल केले आहेत. अनेक प्रमुख खेळाडूंना कायम ठेवले आहे. एदू बेडिया हा त्यापैकीच एक आहे. त्यामुळे नव्या बदलांसह एफसी गोवा क्लब पुढील हंगामात निश्चितच छाप पाडेल, याची सर्वांना खात्री आहे.