वर्षभरात 17 कोटी 54 लाखांचा मुद्देमाल जप्त :
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या वर्षभरात जिल्हा पोलिसांनी अनेक गुन्हेगारी प्रकरणांचा छडा लावून 17 कोटी 54 लाख 59 हजार 195 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरी प्रकरणातील जप्त मुद्देमाल शुक्रवारी न्यायालयाची परवानगी घेऊन पोलीस परेड मैदानावर संबंधितांना सुपूर्द करण्यात आला. या जंगी कारवाईबद्दल जिल्हा पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
शुक्रवारी पोलीस परेड मैदानाजवळ पॉपर्टी परेडचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या वर्षभरात झालेल्या चोरी प्रकरणांचा छडा लाऊन पोलिसांनी जप्त केलेले दागिने, रोकड, वाहने, या परेडमध्ये मांडण्यात आले होते. बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक एन. सतीशकुमार यांच्या हस्ते पॉपर्टी परेडचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी आदींसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकातून आलेले अधिकारी उपस्थित होते.
पॉपर्टी परेडच्या उद्घाटनानंतर चोरी प्रकरणातील जप्त मुद्देमाल संबंधितांना परत करण्याचा सांकेतिक कार्यक्रम झाला. पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते मुद्देमाल परत करण्यात आला. जिल्हा पोलीसप्रमुखांनी यासंबंधी माहिती दिली असून 201 चोऱ्या, घरफोड्या, दरोडे आदी प्रकरणांचा छडा लावून 324 आरोपींना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
201 गुन्हेगारी प्रकरणांत 17 कोटी 54 लाख 59 हजार 195 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी गेल्या वर्षभरात 7 कोटी 47 लाख 22 हजार 375 रोकड जप्त केली आहे. तर 59 लाख 62 हजार 220 रुपये किमतीचे मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
संबंधितांना परत करण्याची प्रक्रिया सुरू
वेगवेगळ्या गुन्हेगारी प्रकरणात 8 किलो 369 ग्रॅम 776 मिली सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 4 कोटी 18 लाख 48 हजार रुपये इतकी होते. तर 4 लाख 91 हजार 600 रुपये किमतीचे सात किलो 23 ग्रॅम 101 मिली चांदी जप्त करण्यात आली आहे. हे दागिने न्यायालयाची परवानगी घेऊन संबंधितांना परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
बॉक्स
250 दुचाकी जप्त
गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात चोरीला गेलेल्या 1 कोटी 24 लाख 60 हजार किमतीच्या 250 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तर 3 कोटी 99 लाख 75 हजार किमतीची चारचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. गेल्या वर्षभरात झालेल्या महत्त्वांच्या प्रकरणांचा तपास लावण्यात आला आहे.
बॉक्स
डीसीसी बँकेतील चोरीचा उलगडा
6 मार्च 2022 रोजी मुरगोड येथील डीसीसी बँकेच्या शाखेत मोठी चोरी झाली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी चार स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली होती. पोलिसांनी तिघा जणांना अटक करून 5 कोटी 84 लाख 70 हजार 620 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. आरोपींनी रोकड व दागिने उसाच्या मळ्यात पुरून ठेवले होते.