वार्ताहर /कडोली
गुंजेनहट्टी येथील जागृत देवस्थान श्री होळी कामाण्णा देवालयाच्या यात्रोत्सवाला मंगळवारी लाखो भाविकांनी उपस्थिती दर्शवून नवस फेडला. किरकोळ घटना वगळता चोख पोलीस बंदोबस्तात यात्रा उत्साहात पार पडली. बेळगावसह कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले गुंजेनहट्टी येथील श्री होळी कामाण्णा देवालयाचा यात्रोत्सव सालाबादप्रमाणे यावर्षीही अपूर्व उत्साहात पार पडला. देवस्थान पंचकमिटीच्या आवाहनानुसार सकाळी 10 वाजता भरयात्रेला प्रारंभ झाला. तत्पूर्वी मंदिरात होळी कामाण्णा मूर्तीप्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर विधीवत पूजा झाल्यानंतर यात्रेला सुरुवात झाली. सकाळपासूनच भाविकांनी उपस्थिती दर्शवून देवालयाचे दर्शन घेतले. दुपारी 12 वाजल्यानंतर भाविकांची गर्दी लक्षणीय झाली होती.
दुपारच्या वेळी गर्दी जास्त वाढल्याचे पाहून सोने लांबविणाऱ्या चोरट्यांनी थोडा हात मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी या गर्दीत दोन महिलांच्या अंगावरील सोने लांबविण्याचा प्रकार घडला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सोने चोरीबद्दल सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले. त्यामुळे सर्व भाविक अत्यंत सतर्कतेने देवालयाचे दर्शन घेताना दिसत होते. काकती पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून सकाळपासून वाहन पार्कींगकरिता योग्य काळजी घेतल्यामुळे मंदिर परिसरात चारचाकी वाहने जाण्यास बंदी होती. त्यामुळे यावर्षी वाहनांमुळे होणारा त्रास झाला नाही. यावेळी कडोली आणि देवगिरी येथे चारचाकी वाहनांसाठी पार्कींगची व्यवस्था करण्यात आली. य् ाात्रा सुरळीत पार पडण्यासाठी आणि नियंत्रण ठेवण्यासाठी काकती पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरणकुमार, उपनिरीक्षक चन्नबसाप्पा सी. ए., केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, ग्रा.पं. सदस्य राजू मायाण्णा, प्रेमा नरोटी, देवस्थान पंचकमिटी विशेष लक्ष ठेवून होते.