ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिंदे गटातील मंत्री दादा भुसे पोलिसांसमोरच एका तरुणाला शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना मुख्यमंत्री शिंदे हे भुसेंवर कारवाई करणार का? असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
आव्हाड यांनी हा व्हिडिओ ट्विट करत म्हटले आहे की, “मंत्री दादा भूसे फटकावतात. शिव्या देतात, मुख्यमंत्री साहेब… कुठला गुन्हा पोलीस घेणार… पोलिसांसमोर मारले.. माझा नग्न फोटो फेसबुकवर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलत. सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौज उभी केलीत. सुप्रीम कोर्टामध्ये रात्री त्या विकृत बरोबर आपली बैठक झाली… आता बोला”, असा प्रश्नही आव्हाड यांनी विचारला आहे.
हा व्हिडिओ हिरकणी कक्षातील आहे. दादा भुसे या तरुणांना काही प्रश्न विचारत आहेत. दोन्ही तरुणांनी मद्यपान केलेले आहे. दादा भुसे शिवीगाळ करत यामधील एका तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत. पण हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, कोणत्या कारणासाठी दादा भुसे यांनी तरुणांना मारहाण केली? त्या तरुणांची चूक काय होती, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
पण विरोधकांनी शिंदे गटाच्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यानंतर आता दादा भुसे यांच्यावर आरोप केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विरोधक विधिमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा लावून धरण्याची शक्यता आहे.