कारवरील नियंत्रण सुटल्याने झाडाला धडक, दोन मित्र गंभीर
प्रतिनिधी /बेळगाव
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील उक्कडजवळ भरधाव कारची रस्त्याशेजारील झाडाला धडक बसून शास्त्राr चौक, मिरज येथील एका युवकाचा मृत्यू झाला. तर कारमधील अन्य दोघे जण जखमी झाले. रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. काकती पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.
सुलतान पीर चमनमलिक (वय 23) रा. शास्त्राr चौक, मिरज असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे मित्र राहिल रशीद शेख (वय 22) रा. रेव्हेन्यू गल्ली, मिरज, अनिश सिकंदर तारळेकर (वय 22) रा. खोतनगर, मिरज अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
अपघाताची माहिती मिळताच काकतीचे पोलीस निरीक्षक गुरुनाथ आय. एस. व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत जखमींना इस्पितळात हलविण्यात आले होते. मिरज येथील सुलतानच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी तेही बेळगावात दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत उत्तरीय तपासणीची प्रक्रिया सुरू होती.
सुलतानचे वडील पीर चमनमलिक यांनी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. सुलतान व त्याचे मित्र राहिल व अनिश हे कारमधून मित्राच्या घरी जेवणासाठी बेळगावला येत होते. स्वतः सुलतान कार चालवत होता. त्याच्या शेजारी अनिश बसला होता. कारवरील नियंत्रण सुटून रस्त्याशेजारील झाडाला कारची धडक बसली. त्यावेळी हा अपघात घडला. काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत.