शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वच घटकांच्या प्रश्नांवर आवाज
सागरूळ / वार्ताहर
राज्याच्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी लक्षवेधी मांडत तसेच तारांकित प्रश्न ,पुरवणी प्रश्न व प्रश्नोतराच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणी वैदकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले.
विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी मांडताना आमदार आसगांवकर यांनी राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगा हप्ता त्वरित मिळावा . महाराष्ट्रात सन २००१ पूर्वी स्थापन झालेल्या ८९ शिक्षणशास्त्र (बी.एड) महाविद्यालयांना विधी (लॉ) महाविद्यालयाप्रमाणे १०० टक्के अनुदान मंजूर करावे. राज्यातील आश्रम शाळांना वेळेत निधी मिळवा प्रत्येक जिल्ह्यात निधी वाटपात तपावत असून त्यात समानता आणावी. आयुर्वेदिक कॉलेजच्या प्रश्नाबाबत लक्षवेधी मांडताना, राज्यात बीएएमएस (BAMS) कॉलेजमध्ये शासनाने प्राध्यापक व डॉक्टरांची कायमस्वरूपी भरती करावी, कंत्राटी डॉक्टरांचे दोन वर्षे थकलेले वेतन त्वरित मिळावे .राज्यातील ज्या महाविद्यालयात कॉफीची प्रकरणे वाढत आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा मागण्या लक्षवेधीद्वारे केल्या .
आमदार जयंत आसगावकर यांनी पुरवणी मागणीवर बोलताना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक घटकांसाठी बजेटमध्ये जादा निधीची तरतूद करावी, पीएम श्री योजनेअंतर्गत खाजगी माध्यमिक शाळांकरिता निधीची तरतूद करावी, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत विनाअनुदान शाळांना जादा निधीची तरतूद करावी, सातव्या वेतन आयोगांतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना थकीत हप्ते द्यावेत . नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी जादा निधीची तरतूद व्हावी, सारथी म्हणून नियुक्त कंत्राटी शिक्षकांचे मानधन १ तारखेला करावे, सैनिकी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी जादा निधीची तरतूद करावी, जिल्हास्तर क्रीडा संकुल दुरुस्ती करता अतिरिक्त निधीची तरतूद करावी, प्राथमिक व माध्यमिक शाळांना भौतिक सुविधा वाढीसाठी तरतूद करावी .कौशल्य विभाग, वैद्यकीय शिक्षण आणि जुन्या पेन्शनसाठीही जादा निधीची तरतूद करावी यासह इतर घटकांसाठी भरगच्च निधीची तरतूद करण्याची मागणी यावेळी आमदार जयंत आसगावकर यांनी केली.
तारांकित प्रश्नांवर बोलताना आमदार जयंत आसगावकर यांनी राज्यातील अनुदानित आणि टप्प्यावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य योजना ही सुविधा लागू करावीअशी मागणी केली. प्रश्नोत्तराच्या काळात बोलताना आमदार आसगांवकर यांनी जावक क्रमांक नसणाऱ्या शिक्षकांना ६ पुरावे सादर करून पात्र करावे .या कामात चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी.
विद्यार्थ्यांच्या समस्येवर आवाज उठवताना कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती पाहता इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेसाठी घेण्यात येणाऱ्या कॅम्प राऊंडला शासनाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार जयंत आसगावकर यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन वेळी केली.
शिक्षक मतदार संघामध्ये फक्त शिक्षक व प्राध्यापक यांचेच मतदान असते. मात्र आमदार आसगावकर स्वतः प्राध्यापक व ग्रामीण भागातील संस्थाचालक असल्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांच्या प्रलंबित प्रश्नावर आवाज उठवल्याने शिक्षण क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे