पुलाची शिरोली/ वार्ताहर
आमदार फसवणूक प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या पुलाची शिरोलीतील रियाज शेखला जामीन मिळाल्यानंतर शिरोलीत जल्लोष करणाऱ्या सहा जणांवर एमआयडीसी पोलिसांनी काल रात्री कारवाई केली. पोलीस प्रशासनाने स्वतः यामध्ये फिर्यादी होऊन रियाज, त्याची आई व पत्नीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रियाज आल्लाबक्ष शेख, युनूस अजिज शेख, मतिन शब्बीर महात, सिकंदर नूरमहंमद कवठेकर, रशिदा आल्लाबक्ष शेख व पायल रियाज शेख अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, राज्यातील सत्तांतरानंतर आमदारांना कॅबिनेट मंत्रीपद देण्याच्या आमिषाने शंभर कोटी रुपयांची मागणी करून फसवणूक करणाऱ्या प्रमुख आरोपींपैकी एक रियाज शेख याला १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात त्याला जामीन होऊन त्याची जेलमधून सुटका करण्यात आली. त्याच्या सुटकेच्या आनंदाने पुलाची शिरोली येथे मोठ्या उत्साहात त्याचे स्वागत करण्यात आले. मोटारीच्या बोनेटवर बसून फटाक्यांच्या आतषबाजीत करत, पुष्प उधळण करत संगीताच्या तालावर त्याचे शिरोलीत आगमन झाले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन रियाज शेखसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मिरखा हे करत आहेत.
हे ही वाचा : चंद्रकांत खैरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय; बंडखोर आमदार शिरसाटांची जहरी टीका
शुक्रवारी याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला व्हिडिओ मिळाला असता स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजय बोर्ले, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, शिवानंद कुंभार, सागर पाटील यांनी ही कारवाई केली.