आरक्षणाच्या लढाईत काँग्रेसचे आमदार मराठा समाजासोबत; सरकारने मनोज जरांगे-पाटील यांची काळजी घ्यावी; सरकारने 24 ऑक्टोबरची डेडलाईन पाळली नाही
कोल्हापूर प्रतिनिधी
जिह्यातील काँग्रेसच्या सहा आमदारांनी मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा दिला असून त्यांचे सर्व राजकीय कार्यक्रम रद्द केले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार बैठकीत दिली. सरकारने 1 महिन्यात आरक्षणाबाबत निर्णय घेतो असे सांगितले होते. पण आजतागायत कोणताही ठोस निर्णय झाला नसून सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक केली जात आहे. आरक्षणप्रश्नी सरकार अपयशी ठरले आहे, अशी टिका आमदार सतेज पाटील यांनी केली.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार पी एन पाटील, आमदार राजू आवळे, आमदार जयश्री जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट करून पाठींबा जाहीर केला. आमदार ऋतुराज पाटील व शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचाही मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार सतेज पाटील म्हणाले, मंत्री उपसमितीच्या बैठकीत काहीच ठोस निर्णय झालेला नाही. राज्यशासनाने ईडब्ल्यूएस प्रमाणे मराठा समाजाला केंद्र शासनाकडून आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पण राज्यातील महायुती सरकार हा प्रश्न प्रलंबित ठेवण्याच्या मानसिकतेत आहे. गेले काही दिवस राज्यभर आंदोलन पेटले असताना कोणताही ठोस निर्णय जाहीर न करणे ही एक प्रकारची मराठा समाजाची फसवणूक आहे. या प्रश्नी राज्य सरकार शंभर टक्के अपयशी ठरले आहे. 24 ऑक्टोबरपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घेतो असे सरकारने स्पष्ट केले होते. मात्र या कालावधीत आरक्षणाबाबत कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही. आरक्षणाचा विषय प्रलंबित ठेवण्याचीच सरकारची भूमिका असल्याचे स्पष्ट होते. सरकारने तत्काळ कार्यवाही करणे आवश्यक आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्यपातळीवरील प्रमुख नेते राज्यपालांची भेट घेणार असून आरक्षणाबाबत तातडीने मार्ग काढण्याची विनंती करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे.
आमदार पी. एन. पाटील म्हणाले, सरकारने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवून त्यामध्ये चर्चा करून निर्णय घ्यावा. केंद्र शासनाने घटनादुरूस्ती करून आरक्षणाबाबतचे अधिकार राज्याला द्यावेत. तरच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल.