कोरोनाविरुद्धच्या लढय़ासाठी केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबाबत भारत सरकार अलर्ट मोडवर आहे. याचदरम्यान केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मंगळवार, 27 डिसेंबर रोजी देशभरातील सर्व आरोग्य सुविधांवर मॉक ड्रिल (प्रात्यक्षिकपर रंगीत तालीम) आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या आरोग्यविषयक प्रात्यक्षिकांवेळी उपचारांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांची चाचपणी केली जाणार आहे. कोरोनाविरोधातील मोहीमेत वापरल्या जाणाऱया आरोग्य सुविधांचे व्यवस्थापन करण्यासाठी सुसज्जता सुनिश्चित करणे हा मॉक ड्रिलचा मुख्य उद्देश आहे. विशेषतः ऑक्सिजन किट आणि व्हेंटिलेटरबाबत राज्यांना अतिसतर्क राहण्यास सांगितले आहे.
चीनमधील कोविडच्या वाढत्या भीतीच्या पार्श्वभूमीवर, केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मंगळवारी (27 डिसेंबर) देशभरातील कोविड केंद्रांसह सर्व आरोग्य सुविधांवर मॉक ड्रिल घेण्यास सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात यासंबंधी स्पष्ट निर्देश दिले आहेत. जगभरातील अनेक देशांमध्ये कोविड प्रकरणांची वाढती संख्या लक्षात घेता सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी सार्वजनिक आरोग्यविषयक उपाययोजना करणे आवश्यक आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत कोविड-19 आरोग्य सुविधांची तयारी महत्त्वाची असल्याने सर्व रुग्णालयांनी हे मॉक ड्रिल करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. हे मॉक ड्रिल संबंधित जिल्हाधिकाऱयांच्या/जिल्हा दंडाधिकाऱयांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांशी सल्लामसलत करून केले जाऊ शकते, असे पत्रात म्हटले आहे.
सुविधांची तपासणी होणार
या मॉक ड्रिलदरम्यान आरोग्य सुविधांची भौगोलिकदृष्टय़ा प्रातिनिधिक उपलब्धता पाहणे, खाटांची क्षमता तपासणे, आयसोलेशन बेड सज्ज ठेवणे, ऑक्सिजन सपोर्टेड आयसोलेशन बेड, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर असलेले बेड तपासण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱयांची उपलब्धता, रुग्णवाहिकांची स्थिती आणि चाचणी क्षमता, लॉजिस्टिकची उपलब्धता, आवश्यक औषधे, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन किटची उपलब्धता मॉक ड्रिलद्वारे सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.
विमानतळांवर तपासणी वाढवली
केंद्र सरकारने आरोग्य यंत्रणांना दिलेल्या निर्देशानंतर विमानतळांवरील तपासण्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. चीन, जपानसह 5 देशांतून येणाऱया प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी आवश्यक असेल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी जाहीर केले होते. त्यानुसार या देशातील कोणत्याही प्रवाशाला कोविड-19 ची लक्षणे आढळल्यास किंवा चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास या लोकांना अलग ठेवण्यात येत आहे.