पुणे / प्रतिनिधी :
पुण्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीष बापट यांचे अकस्मात निधन झाल्यानंतर पुण्यातील खासदारपदाची जागा रिक्त झालेली आहे. लोकसभा निवडणुकीस एक वर्षाचा कालावधी शिल्लक असल्याने या जागेवर अद्याप निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक होऊ शकलेली नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदी यांनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी करणारे पत्र माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे.
पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून संजय काकडे, माजी आमदार मेधा कुलकर्णी, भाजप नेते संजय देवधर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, दिवंगत खासदार बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट या इच्छुक आहेत. दरम्यान, पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातून लोकसभा निवडणुक लढवावी, असे पत्रच काकडे यांनी पाठविल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत. याबाबत बोलताना काकडे म्हणाले, उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक लोकसभेच्या जागा महाराष्ट्रात आहेत. उत्तरप्रदेशमध्ये भाजपला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक लढल्यास सर्वच्या सर्व 48 जागा भाजप व मित्रपक्ष जिंकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील नऊ वर्षाच्या कारकीर्दीत देश प्रगतिपथावर आहे. जगभरात मोदी यांच्या नेतृत्वाचे स्वागत होत असून त्यांच्या कामाचा गौरव होत आहे. त्यांच्याविरोधात देशातील विविध पक्षांनी एकत्रित येऊन अनेक बैठका घेतल्या आहेत. परंतु त्याचा कोणताही उपयोग होणार नसून विरोधकांना घराणेशाहीच्या भवितव्याची चिंता आहे. मोदी यांनी पुण्यातून निवडणूक लढल्यास आमच्यासारखे कार्यकर्ते शहरात घरोघर जाऊन प्रचार करतील व मोदी यांना सर्वाधिक मतांनी निवडून आणतील. त्यामुळे सध्या जी 45 जागा आम्ही जिंकू अशी अपेक्षा आहे, ती मोदी महाराष्ट्रात आल्यास सर्वच जागा जिंकू, अशी परिस्थिती निर्माण होईल.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी पुण्यातून निवडणुक लढल्यास त्यांच्याविरोधात आपण निवडणूक जिंकून त्यांना पराभूत करु, असे मत कसब्याचे कॉंग्रेस आमदार रवीन्द्र धंगेकर यांनी व्यक्त केला आहे. त्याबाबत काकडे म्हणाले, देशात लोकशाही असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कोणीही निवडणूक लढवू शकते. धंगेकर यांना लोकसभा निवडणुक जिंकण्यास माझ्या शुभेच्छा असून मोदी यांच्याविरोधात कोणी ही निवडणूक लढले तरी त्यांचे डिपॉझीट जप्त होईल.