वार्विकशायरविरुद्ध कैंटी सामन्यात सॉमरसेट 36 धावांनी आघाडीवर
लंडन / वृत्तसंस्था
भारताचा स्टार बॉलर मोहम्मद सिराजने सॉमरसेटविरुद्ध डावात 5 बळी घेत वार्विकशायरतर्फे आपले कौंटी पदार्पण थाटात साजरे केले. कौंटी चॅम्पियनशिप डीव्हिजन वन स्पर्धेतील लढतीत त्याने 82 धावात 5 बळी, असे पृथक्करण नोंदवले. मात्र, यानंतरही या सामन्यात प्रतिस्पर्धी सॉमरसेटचा संघ 36 धावांनी आघाडीवर आहे. सॉमरसेटचा पहिला डाव सर्वबाद 219 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात वार्विकशायरला सर्वबाद 196 धावांवर समाधान मानावे लागले. सॉमरसेटची दुसऱया डावात 2 बाद 13 अशी दुर्दशा झाली.
वार्विकशायर व सॉमरसेट हे दोन्ही संघ रिलेगेशन टाळण्यासाठी प्रयत्न करत असून येथील संथगती गोलंदाजीला पोषक खेळपट्टीवर तग धरणे दोन्ही संघातील फलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरत राहिले. दुसऱया दिवसाच्या खेळात सॉमरसेटने 8 बाद 182 धावांवरुन डावाला पुढे सुरुवात केली. मात्र, गेगरी चौथ्याच चेंडूवर बाद झाला. त्याने सिराजच्या चेंडूवर यष्टीमागे झेल दिला. साजिद खान व ब्रूक्स या जोडीने मात्र शेवटच्या गडय़ासाठी 37 धावांची भागीदारी साकारत संघाला 200 धावांचा टप्पा पार करुन दिला. साजिद खानने यादरम्यान आपले चौथे प्रथमश्रेणी अर्धशतक नोंदवले.
मोहम्मद सिराजने (5-82) निम्मा संघ गारद केला असला तरी त्यांनी यानंतरही 7 बाद 82 वरुन सर्वबाद 219 धावांपर्यंत मजल मारली. लुईस ग्रेगरीने 97 चेंडूत 60 तर साजिद खानने 64 चेंडूत नाबाद 53 धावांचे योगदान दिले. पुढे सॉमरसेटने 14 षटकात वार्विकशायरची 3 बाद 22 अशी स्थिती केली होती. जोश डॅव्हेने रॉब येट्सला यष्टीरक्षक जेम्स ऱयूकरवी झेलबाद केले. त्यानंतर ग्रेगरीने ऍलेक्स डेव्हिस व डॉमिनिक सिबली यांना बाद केले.
38 वर्षीय जॅक ब्रूक्सने 40 धावात 4 बळी घेतले. यात 27 चेंडूत 7 धावात 4 बळींचा त्याचा स्पेल भेदक ठरला. त्याच्या तिखट माऱयासमोर यजमान संघ सर्वबाद 196 धावांत खुर्दा झाला. सॅम हैनने वार्विकशायरतर्फे सर्वाधिक 67 धावांचे योगदान दिले. दिवसातील 8 षटकांचा खेळ बाकी असताना सॉमरसेटकडे 23 धावांची आघाडी होती. मात्र, दिवसअखेर त्यांना अवघ्या 13 धावात 2 बळी गमवावे लागले. या लढतीत सॉमरसेटचा संघ 36 धावांनी आघाडीवर असून त्यांचे 8 गडी बाकी आहेत.
संक्षिप्त धावफलक
सॉमरसेट पहिला डाव ः 65.4 षटकात सर्वबाद 219 (गेगरी 60, साजिद खान नाबाद 53, सिराज 5-82). वार्विकशायर पहिला डाव ः 81.2 षटकात सर्वबाद 196 (सॅम हैन 67, ब्रूक्स 4-40). सॉमरसेट दुसरा डाव ः 8 षटकात 2 बाद 13.