प्रतिनिधी / यशवंतनगर :
Masoor Robbery मार्च महिन्यात मसूर (ता. कराड) येथे दरोडा घालणाऱ्या आंतरजिल्हा टोळीसह दरोडेखोरांकडून सोने विकत घेणाऱ्या सोनाराविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गंत (मोक्का) दोषारोपपत्र पाठवण्यास अपर पोलीस महासंचालक (महाराष्ट्र राज्य कायदा व सुव्यवस्था) यांच्याकडून अंतिम मंजुरी मिळाली आहे. तपासी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील व कराड उपविभाग टीमच्या सखोल व कसोशीने केलेल्या तपास यश आले आहे. सोनाराविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई बहुदा राज्यातील पहिलीच कारवाई आहे.
मसूर येथे 2 मार्च 2022 रोजी रात्री डॉ. संपत इराप्पा वारे यांच्या बंगल्याचे दार उचकटून डॉ. दाम्पत्यास मारहाण करून दागिने व रोख रक्कम असा सुमारे पाच लाख नऊ हजार पाचशे रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला होता. उंब्रज पोलीस ठाण्यात दरोडय़ाचा गुन्हा दाखल झाला होता.
अधिक वाचा : महाराष्ट्रात आजपासून यलो अलर्ट
जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे उंब्रजचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी तपास करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने निष्पन्न केलेले पाच आरोपींकडून काही ऐवज हस्तगत केला होता. आरोपी हे टोळीने गुन्हे करणारे कुख्यात गुन्हेगार असल्याने त्यांच्याकडून चोरीचा माल घेऊन गडगंज झालेले सोनार आरोपीचे नातेवाईक यांनी गुह्यातील चोरीचा माल घेऊन गुन्हेगारांना मदत केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनाही सहआरोपी करण्यात आले होते.
संघटित गुन्हे करणाऱ्या सदर आरोपींविरुद्ध विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे मोक्का कायद्यान्वये कलमे लावण्याबाबत प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रमुखांमार्फत पाठवला होता. मोक्का लावण्याची पूर्वपरवानगी प्राप्त झाल्यानंतर पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील हे करीत होते.
रणजीत पाटील व तपास पथकाने आरोपीचे गुह्यांचे पूर्वरेकॉर्ड संकलित करणे आरोपींच्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती संकलित करणे, एका फरार आरोपीस अटक करून अन्य पुरावे गोळा करून दोषारोपपत्र मंजुरी करता महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडे पाठवले होते. त्यानुसार अपर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सारंगल यांनी आरोपी होमराज उर्फ होम्या उद्धव काळे (वय 31, रा. वाकी शिवार, ता. आष्टी, जि. बीड, अजय उर्फ आज्या सुभाष भोसले (वय 23), सचिन उर्फ आसी सुभाष भोसले (वय 24), अविनाश उर्फ महिंद्रा सुभाष भोसले (वय 22), रुस्तुमबाई सुभाष भोसले (वय 55), सोनार निलेश संतोष पंडित (सर्व रा. माही जळगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर), राहुल उर्फ काळय़ा पदू भोसले (वय 28, रा. वाळूज, पारगाव, पोस्ट पाथर्डी), गणेश उर्फ बन्सी रंगीशा काळे (रा. राशीन, ता. कर्जत, जि. अहमदनगर) त्यांच्याविरुद्ध दोषारोप पाठविण्यास मंजुरी दिली आहे.
उपविभागीय अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांच्यासह तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, प्रवीण जाधव, बी. एस. कांबळे, पोलीस अंमलदार असिफ जमादार, एस. एम. सपाटे, एस. पी. साळुंखे, एस. पी. गुरव, एस. एस. जाधव, संजय देवकुळे, संदीप पवार, श्रीधर माने यांनी परिपूर्ण तपासासाठी परिश्रम घेतले.