गोव्यासाठी पुढील चार दिवस ‘एलो अलर्ट’
प्रतिनिधी/पणजी
मान्सूनचे केरळात आगमन झाले असून गोवा राज्यासाठी पुढील चार दिवस ‘एलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने सदर माहिती प्रकाशित केली असून मान्सून नियोजित तारखेच्या दोन दिवस अगोदर केरळमध्ये दाखल झाल्याचे म्हटले आहे. गुरूवारपर्यंत मान्सून गोव्यात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मान्सूनची वाटचाल केरळकडून कर्नाटक, गोवा, महाराष्ट्राच्या दिशेने होणार आहे. पावसासाठी हवामानासंदर्भात पुढील आठवडय़ात खात्याकडून अधिक तपशीलवार माहिती दिली जाणार आहे.
गोवा किनारपट्टीवर आगामी चार दिवसांत ढगांचा गडगडाट आणि विजांच्या चमचमाटासह पाऊस पडणार असल्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे. या कालावधीत वाऱयाचा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रति तास असा राहण्याची शक्यता असून मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. हवामान केंव्हाही बदलून खराब होऊ शकते, असे वेधशाळेने बजावले आहे.