देवभूमी केरळात अखेर नैऋत्य मोसमी वारे थडकल्याने आता खऱ्या अर्थाने मान्सूनच्या प्रवासाला सुऊवात झाली आहे. किंबहुना, त्याचा पुढचा प्रवास कसा होतो, देशाच्या वेगवेगळ्या भागांत पावसाचे प्रमाण कसे राहते, त्यातून पीकपाण्याची स्थिती कशी राहते, यावरच देशाचे पुढचे चित्र अवलंबून असेल. देशातील 65 टक्के लोकसंख्या आजही शेती वा शेतीपूरक उद्योगांवर अवलंबून असून, या शेतीचे भरण व पोषण करण्याचे काम हे प्रामुख्याने मान्सूनचा पाऊसच करीत असतो. जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा कालावधी हा पावसाचा हंगाम मानला जातो. साधारणपणे 10 ते 15 जुलैपर्यंतचा काळ हा पेरणीसाठी आदर्श मानतात. त्यामुळे मोसमी वारे वेळेवर दाखल होणे व सर्वदूर पाऊस होणे, हे अत्यंत महत्त्वाचे असते. 20 ते 22 मेच्या आसपास मान्सून अंदमान व निकोबार बेटावर, 1 जूनच्या आसपास केरळात, 7 जूनला तळकोकणात, तर 15 जुलैपर्यंत संपूर्ण भारतात सक्रिय होतो. यंदाच्या वर्षी मोसमी वाऱ्यांचे अंदमान व निकोबार बेटासह अंदमान समुद्रात वेळापत्रकानुसार आगमन झाले असले, तरी नंतरचा त्यांचा प्रवास हा रेंगाळलेलाच राहिल्याचे दिसून आले. मान्सूनचा एकूणच रागरंग पाहता हवामान विभागानेही 4 जूनपर्यंत त्याचे केरळात आगमन होण्याची शक्यता वर्तविली होती. प्रत्यक्षात आणखी चार दिवस विलंब लावत 8 जूनला मोसमी पाऊस केरळात सक्रिय झाला आहे. सध्या देवभूमीत सर्वदूर चांगला पाऊस होत असून, पुढच्या वाटचालीसाठी पोषक हवामान निर्माण झाल्याचे दिसते. हे एक चांगले चिन्ह म्हणावयास हवे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे डोळे मृग नक्षत्राकडे लागलेले असतात. 7 जूनपासून मृग नक्षत्रास प्रारंभ झाला असून, मोसमी पावसाने आपला मुहूर्त चुकविला आहे. येत्या 13 जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस कोकणासह राज्यातील नागरिकांना पावसाची वाट पहावी लागेल. हवामान विभागाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार यंदाच्या वर्षी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर किमान व कमाल तापमानही सरासरीपेक्षा अधिक राहू शकते. सध्या याचा अनुभव देशातील नागरिक घेताना दिसतात. आता कमी पावसाची शक्यता गृहीत धरून शेती व शेतीविषयक कामांसंदर्भातही शेतकऱ्यांनी काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते. मृग नक्षत्रातील पावसाला धरून शेतकरी दरवर्षी शेतीविषयक नियोजन करीत असतात. तथापि, जूनमध्ये कशी स्थिती असेल, याचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पुढची पाऊल टाकणे महत्त्वाचे असेल. पेरण्या वाया गेल्या, तर शेतकऱ्यांना अनेकदा दुबार, तिबार पेरण्या कराव्या लागतात. त्याचे त्यांच्या अर्थकारणावर गंभीर परिणाम होतात. म्हणूनच अशी वेळ येऊ नये, याकरिता आवश्यक ती काळजी शेतकरी बांधवांनी घ्यावी. यंदा मार्च, एप्रिलमध्ये काही जिल्ह्यांत वळवाचा पाऊस चांगला झाला. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या वेगवेगळ्या भागाला अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ऐन उन्हाळ्यात नद्यांना पूर आल्याचे दृश्यही कधी नव्हे, ते पहायला मिळाले. उष्णतामान कमी करण्याबरोबरच जमिनीतील भूजलसाठा वाढविण्यासह ओलाव्याकरिताही असा पाऊस महत्त्वाचा असतो. किंबहुना, जूनमधील पाऊस नांगरणी, मशागतीनंतर पेरणीकरिता मुख्यत: साह्याभूत ठरतो. त्यामुळे सरासरी कमी राहिली, तरी पावसाने हजेरी लावणे शेतीकरिता चांगले राहील. यंदाच्या हंगामात सरासरीच्या 96 टक्के पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्याचबरोबर या वर्षी एल निनो हा घटक सक्रिय राहण्याचीही शक्यता आहे. एल निनोसंदर्भात बरीच मतमतांतरे आढळतात. एल निनोचा पावसावर परिणाम होतो, असे मानले जाते. तथापि, हा घटक असूनही देशात चांगला पाऊस झाल्याची उदाहरणे असल्याकडेही हवामान विभाग लक्ष वेधतो. चालू वर्षीच्या मान्सूनवर एल निनोचा कोणताही परिणाम होणार नाही, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे. तसे होणार असेल, तर ते नक्कीच चांगले लक्षण ठरावे. त्यात इंडियन ओशन डायपोल सक्रिय झाल्याने ही प्रतिकूलता भरून निघू शकते, असाही एक आशावाद व्यक्त केला जातो. तोही ध्यानात घेण्यासारखा आहे. म्हणूनच याबाबत चिंतातुर होण्याची आवश्यकता नाही. अलीकडे स्कायमेट या खासगी संस्थेकडूनही हवामानविषयक अंदाज दिला जातो. तथापि, या संस्थेकडे स्वत:ची अशी व्यापक यंत्रणा नाही. आयएमडीच्या यंत्रणेवरच त्यांची बरीचशी भिस्त दिसून येते. असे असले, तरी त्यांनी या वर्षी मान्सून काहीसा कमजोर राहणार असल्याचा वर्तविलेला अंदाज गृहीत धरूनही काही उपाययोजना कराव्या लागतील. जूनमध्ये पाऊस कमी झाला, तरी त्याचा पिकांवर परिणाम होऊ शकतो. मागच्या काही वर्षांत शेतीला मोठ्या प्रमाणात हवामान बदलाला सामोरे जावे लागत आहे. हा हंगामही वातावरण बदलाच्या कचाट्यात सापडला, तर पुढचे गणित बिघडू शकते. त्यातून महागाई वाढण्याचा धोकाही संभवतो. भारतासारख्या देशात मान्सूनचे स्थान हे अनन्यसाधारण असेच आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवरही मोसमी पावसाचा परिणाम होत असतो. कोरोना काळात इतर क्षेत्रे कुंठितावस्थेत असताना कृषी क्षेत्रानेच भारताला तारले. ते या मोसमी पावसाच्या बळावरच. हे लक्षात घेता जूनमध्ये ताण दिला, तरी जुलै, ऑगस्टचा पाऊस कसा होतो, याकडे देशाचे लक्ष असेल. चांगला पाऊस झाल्यानंतरही देशाच्या अनेक भागांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईशी सामना करावा लागतो. ही दुर्दैवाची बाब आहे. म्हणूनच पावसाळ्यातील पाण्याचा प्रत्येक थेंब कसा अडविता, मुरविता तसेच साठविता येईल, यावर कटाक्ष असायला हवा. याशिवाय बाष्पीभवनातून होणारे नुकसान टाळण्याकरिता बंद नळ पाणी योजना कशा कार्यान्वित करता येतील, याचाही विचार केला पाहिजे. पावसाला ‘आनंदघन’ म्हणूनही संबोधले जाते. समृद्धीचे, भरभराटीचे प्रतीक असलेला हा पाऊसच तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनात खऱ्या अर्थाने आनंद फुलवित असतो. त्याच्या स्वागतासाठी सर्वांनी सज्ज राहुयात.
Previous Articleमर्सिडीज बेंझ जी क्लास 400 डी भारतीय बाजारात
Next Article ‘बीएसएनएल’च्या स्थितीत होतेय सुधारणा
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment