दक्षिण गोव्यातील लोकांना मोपा ठरू लागला महागडा
प्रतिनिधी /मडगाव
मोपा येथून बाणावलीत येणाऱया एका प्रवाशाला टॅक्सी भाडे तब्बल 4180 रूपये द्यावे लागले. टॅक्सी भाडय़ाची रिसिट सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एका विमान तिकीट दराएवढे टॅक्सी भाडे झाल्याच्या प्रतिक्रीया देखील व्यक्त झालेल्या आहेत.
मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर फ्लाईटमधून उतरलेल्या एका प्रवाशाला मोपा ते बाणावली येथील हॉटेलवर येण्यासाठी तब्बल 4180 रूपये भाडे द्यावे लागले. टॅक्सीचे हे भाडे हा आता चर्चेचा विषय झाला आहे. नेटीझन्सही यावरून टीका करत आहेत. जेवढे टॅक्सीभाडे या प्रवाशाला द्यावे लागले आहे तेवढय़ात विमान प्रवासाचे आणखी एक तिकीट खरेदी केले जाऊ शकते, अशा प्रतिक्रीया व्यक्त झालेल्या आहेत.
रोहन गोवेकर असे या प्रवाशाचे नाव आहे. रोहन गोवेकर यांनी त्यांचे टॅक्सीच्या प्रवासी भाडय़ाची रिसीट सोशल मीडियात शेअर केली आहे. टॅक्सी भाडय़ाची ही रिसीट सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. गोवेकर यांनी शेअर केलेल्या रिसीटमध्ये दिसते की मोपा ते बाणावली हे अंतर 65.86 किलोमीटर येवढे आहे. यात टॅक्सीचे भाडे 3227.14 रूपये, सर्व्हिस फी 484.07 रूपये, एअरपोर्ट चार्जेस 160 रूपये आणि जीएसटी 161.36 आणि 115.93 रूपये असे मिळून 4148.50 रूपये बिल आले आहे. त्यावर नेटीझन्सकडून विमान तिकीटाचे दर जास्त की टॅक्सीभाडे जास्त असा सवाल उपस्थित केला आहे.