मुळव्याध, भंगदर, फिशर विकारावरील आयुर्वेदीक उपचारवर तज्ञांचे युवा डॉक्टर्संना मार्गदर्शन : डॉ. ज्ञानेश निकम यांचा मर्म द्रोणाचार्य तर डॉ. रामदास कुटेंचा मर्म आयुर्वेद अचिव्हर, डॉ. शशिधर एम्मी यांचा मर्म धन्वंतरी पुरस्काराने सन्मान
कोल्हापूर प्रतिनिधी
महाआयुर्वेद रिसर्च अँड मेडिकल असोसिएशन (मर्म) या आयुर्वेदिक डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आयोजित अॅनोरक्टल डिसॉडर्स या विषयावरील आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत तब्बल दोनशेहून अधिक डॉक्टरांचा सहभाग होता. गुदविकारातील मुळव्याध, भंगदर, फिशर या विकारासंदर्भात औषधोपचार, शस्त्रक्रिया या विषयी डॉ. वीरधवल पाटील यांच्यासह तज्ञांनी युवा डॉक्टर्सना मार्गदर्शन केले.
कळंबा येथील व्यंकटेश अॅग्रो टुरिझमच्या रिसॉर्टवर झालेल्या या कार्यशाळेत डॉ. ज्ञानेश निकम यांना ‘मर्म द्रोणाचार्य पुरस्कार 2023, डॉ. रामदास कुटे यांना ‘मर्म आयुर्वेद अचिव्हर 2023 पुरस्कार आणि डॉ. शशीधर एम्मी यांना मर्म धन्वंतरी 2023 पुरस्काराने आमदार प्रकाश अबिटकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यशाळेत देशभरातील दोनशेहून अधिक डॉक्टर्स, सर्जन्स व विद्यार्थी डॉक्टरांनी सहभाग घेतला. अॅनोरेक्टल म्हणजे गुद विकार अर्थात मूळव्याध, भगंदर, फिशर आदि विकारावर गेली अनेक वर्षे प्रभावीपणे यशस्वी आयुर्वेदिक उपचार करणाऱ्या देशभरातील नामांकित आयुर्वेदिक सर्जन्सची व्याख्याने झाली. प्रमुख वक्ते डॉ. वीरधवल पाटील, डॉ. ज्ञानेश निकम, डॉ. मयूर पावसकर, डॉ. शशिधर एम्मी, डॉ. सयाजी देसाई, मर्म चे अध्यक्ष डॉ. अजित राजिगरे, पुण्याच्या इंदूकेअर फार्माचे संचालक डॉ. रामदास कुटे यांनी गुदविकारांचे निदान, तपासण्या, शुद्ध आयुर्वेदिक उपचार, क्षारसूत्र चिकित्सा, आधुनिक सर्जरी आदी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
सहभागी पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी शोधनिबंध सादर केले. त्यामधील उत्कृष्ठ शोधनिबंधांना बक्षिसे देण्यात आली. मर्मचे अध्यक्ष डॉ. अजित राजिगरे यांनी आयुर्वेदिक हॉस्पिटलची नोंदणी स्वतंत्रपत्रे व्हावी, अशी मागणी केली. कार्यशाळा यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष डॉ. प्रसाद सणगर, खजानीस डॉ. सचिन गणेशवाडी, सचिव डॉ. पराग कुलकर्णी, सदस्य डॉ. प्रशांत चौगुले, डॉ. रणजीत पाटील, डॉ. अनिकेत पाटील यांनी परिश्रम घेतले. कु. गायत्री कुलकर्णी व डॉ. पराग कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले व उपाध्यक्ष डॉ. प्रसाद सणगर यांनी आभार मानले. यावेळी डॉ. कुणाल कामते, डॉ. लक्ष्मीकांत पाटील, डॉ. प्रशांत चव्हाण, डॉ. शशिकांत कुंभार, डॉ. मंगेश ठमके इत्यादी उपस्थित होते.
गुद विकारात रूग्ण आल्यानंतर तो मुळव्याध आहे, असे सांगतो म्हणून तपासणी न करता कधी कधी औषधोपचार केले जातात. पण युवा डॉक्टरांनी रूग्णाच्या गुदव्दारातील भागाची प्रथम तपासणी करावी. मुळव्याध, भंगदर, फिशर या पैकी कोणता विकार आहे, ते निश्चित करावे, मगच औषधोपचार करायचा की शस्त्रक्रिया याबाबतचा निर्णय घ्यावा. -डॉ. वीरधवल पाटील, एमएस (आयुर्वेद)