जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील आंदोलनात सहभाग
बेळगाव : सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, तसेच जुन्या निवृत्तीवेतन पद्धतीने निवृत्तीवेतन देण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी सरकारी नोकर संघटनेच्यावतीने कामबंद आंदोलनाची हाक दिली होती. बुधवारपासून राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवले. या आंदोलनात महापालिका कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला. त्यामुळे बुधवारी मनपात शुकशुकाट पसरला होता. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे महापालिका कार्यालयाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या तयारीत मनपाचे कर्मचारी मागील काही दिवसांपासून क्यस्त होते. मोदींच्या दौऱ्यानंतर मनपाचे कामकाज सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती. पण सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्र्यांशी सुरू असलेली बोलणी फिस्कटल्याने बुधवारपासून कामबंद आंदोलनाचा निर्णय सरकारी कर्मचारी नोकर संघटनेने घेतला. महापालिकेतील विविध कर्मचारी संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सुरू असलेल्या आंदोलनात महापालिकेच्या कामगारांनी व अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. आंदोलनात सहभागी होण्याबाबत मंगळवारी महापालिका आयुक्त आणि महापौरांची भेट घेऊन माहिती दिली होती. तसेच कार्यालयाचे कामकाज बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले होते.
नागरिकांची कामे रखडली
मनपातील असंख्य कर्मचारी सध्या निवडणूक मतदार यंत्रांची तपासणी करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे मनपा कार्यालयात उपलब्ध राहात नसल्याने नागरिकांची कामे रखडली आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या तयारीमुळे कामे रखडली होती. आता कामबंद आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या कामासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.