पुणे / वार्ताहर :
पुण्यातील एका सराईत गुन्हेगारावर धारधार शस्त्राने वार करुन त्याचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना कर्वे रस्त्यावर घडली. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नंदू जाधव (वय 22) असे खून झालेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी तीन ते चार हल्लेखोरांविरोधात अलंकार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदू जाधव हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर काही दिवसांपूर्वीच मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्याने न्यायालयाकडून जामीन मिळवला होता. जामीन मिळवल्यांतर तो नुकताच येरवडा कारागृहातून बाहेर आला होता. गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तो कर्वे रस्त्यावरील पीएनजी ज्वेलर्ससमोरून पायी घरी निघाला होता. त्याचवेळी हल्लेखोर त्याच्या मागावर होते. रस्ता ओलांडणाऱ्या नंदू जाधववर अचानक चौघांनी धारधार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात नंदू रक्तबंबाळ झाला.
अधिक वाचा : भारत सरकारने कोल्हापुरच्या जवानाला केले ‘पळपुटा’ घोषित
घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जाधवला तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत पुढील तपास अलंकार पोलीस करत आहेत.