पुणे / वार्ताहर :
चरस विक्रीसाठी आलेल्या नगरच्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. सराईताच्या ताब्यातून पोलिसांनी 24 लाख रुपये किंमतीचे दोन किलो चरस जप्त केले आहे.
औरंगजेब पप्पू अन्सारी उर्फ रंगा परदेशी (वय 27, रा. मुकुंदनगर, अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करताना नगरचा सराईत अमली पदार्थ विक्रीसाठी पुण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उरुळी कांचन, पुणे येथे पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन किलो चरस आढळून आले. पोलिसांनी चरस आणि सराईताचा दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त केला आहे. बाजारभावानुसार दोन किलो चरसची किंमत 24 लाख रुपये आहे. सराईताला अटक करुन त्याच्यावर लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकाळभोर पोलीस अधिक तपास करत आहेत.