ऑनलाईन टीम / तरुण भारत :
तुर्कस्तानने (Turkey) आपल्या देशाचे नाव बदलण्याची विनंती संयुक्त राष्ट्राकडे केली होती. त्याला संयुक्त राष्ट्राने मान्यता देताच तुर्कस्ताने आपल्या देशाचे नाव बदलल्याची घोषणा केली. तुर्कस्तान आता ‘तुर्किये’ या नावाने ओळखले जाणार आहे.
का बदलण्यात आलं नावं
तुर्कस्तान किंवा तुर्की हा शब्द तेथील भाषेनुसार नकारात्मक मानला जातो. तुर्कीला इंग्रजीत टर्की म्हटले जाते. केंब्रिज इंग्रजी शब्दकोषानुसार टर्की म्हणजे मूर्ख किंवा पराभूत असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे 1923 साली झालेल्या तुर्कस्तानच्या स्वातंत्र्याच्या घोषणेपासून तेथील नागरिक या देशाचा उल्लेख ‘तुर्किये’ असाच करत आले आहेत. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांचे सरकार बऱ्याच काळापासून तुर्कीचे आंतरराष्ट्रीय नाव बदलून तुर्किये करण्याच्या प्रयत्नात होते. तुर्किये हे जगातील ब्रँडनेम व्हावे, अशी या सरकारची इच्छा आहे.
तुर्कस्तानचे परराष्ट्र मंत्री मेव्हतुल कावुसोग्लू यांनी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांना पत्र लिहून तुर्कस्तानचे नाव बदलून ‘तुर्किये’ करण्याची विनंती केली होती. हे पत्र मिळताच संयुक्त राष्ट्राकडून ठराव घेऊन ही विनंती मान्य करण्यात आली. त्यानंतर लगेचच तुर्कस्तानचे नाव बदलण्यात आल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली.
एर्दोगान यांनी डिसेंबरमध्येच दिले होते आदेश
तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगान यांनी मागील वर्षी डिसेंबरमध्येच देशवासीयांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक गोष्टीत तुर्कस्तान ऐवजी तुर्किय नाव वापरण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासूनच तुर्की मंत्रालयांनी अधिकृत कागदपत्रांमध्ये तुर्किये शब्द वापरण्यास सुरूवात केली होती. तसेच देशातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवरही त्यांनी तुर्किय असाच उल्लेख करण्यास सांगितले होते. तुर्की संस्कृती आणि मूल्यांचे अधिक प्रकारे जतन करण्यासाठी हे आदेश देण्यात आले होते, असे सांगण्यात येते.