सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या सुगम संगीताच्या रिएलिटी शोमध्ये बायणा वास्को येथील नवाब शेख या कलाकाराने महाअंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सध्या रोज रात्री 10 वा. महाअंतिम फेरीचे थेट प्रक्षेपण सुरु असून येत्या 25 रोजी महाअंतिम विजेता निवडला जाणार आहे.
गोव्याच्या सुगम संगीत क्षेत्रात यापूर्वी ख्रिस्ती समाजातील एक दोन कलाकारांनी लौकिक मिळवला होता. मात्र मुस्लीम समाजातील एक कलाकार मराठी भक्तीगीते आणि नाटय़गीते पेश करणारा कलाकार अभावानेच आढळतो. हिंदुस्थानी, शास्त्रीय संगीत क्षेत्रामध्ये मुस्लीम धर्मीय उस्तादांचे खूप मोठे योगदान राहिले आहे. भारतरत्न पं. बिसमिल्ला खान हे शहनाई वादनात एक दंतकथा बनून राहिले. मात्र गोव्यात नवाबच्या रुपाने भक्तीगीते आणि नाटय़गीते पेश करणारा उगवता कलाकार गवसणे ही गोमंतकीय संगीत जगतासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. या संबंधी नवाब शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपले गुरु शरद मठकर यांच्यामुळेच सुगम संगीत गाण्याची जिद्द आपल्यात निर्माण झाल्याचे सांगितले. वास्को शहरात श्री दामोदर सप्ताह आणि अन्य ठिकाणी होणाऱया भजनाच्या मैफली ऐकून आपण प्रभावीत झालो. घरातून कधीच विरोध झाला नाही. उलट आपल्या कलेबद्दल प्रेरणा व प्रोत्साहनच मिळाले. आपल्याला मराठी भाषा जमत नव्हती. परंतू शब्दांचे उच्चारण आणि शब्दफेक गुरुवर्य शरद मठकर यांच्या मार्गदर्शनामुळे शिकता आली. गोव्यात ठिकठिकाणी होणाऱया गायनाच्या स्पर्धा. कला अकादमीची भजन स्पर्धा आदीमुळे आपण स्पर्धक म्हणून नाव मिळविण्या इतपत तयार झालो. पुढे बक्षिसे मिळायला लागली. संगीत कलेची आवड दिवसेंदिवस वाढत गेली शिवाय आपण मुस्लीम असण्याचा फायदाही झाला. कारण लोकांकडून कौतुक व्हायला लागले. मात्र आपण अमराठी असल्यामुळे विशेष मेहनत करावी लागली. कलर्स मराठीच्या व्यासपीठावरून कला सादर करताना गोमंतकीय श्रोत्यांकडून जी कौतुकाची थाप मिळाली त्यामुळे अंतिम फेरीत प्रवेश करू शकलो, असे नवाब शेख सांगतो. गुरुप्रती असलेली भक्ती व श्रद्धा याचा तो विशेष उल्लेख करतो.
नवाब शेखचे गुरु शरद मठकर म्हणाले, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ही सर्वसंगीत प्रकारांची जननी आहे. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला सुगम संगीताची आवड असल्यास आपण त्यांना विरोध करीत नाही. उलट जमेल तसे मार्गदर्शन करतो. वास्को येथील आपले विद्यार्थीनी मृणमयी तिरोडकर ही ‘झी’ टीव्हीच्या ‘सारेगमप’ या रिएलिटी शोमध्ये चमकली होती. अंतिम फेरीही तिने गाठली होती. अन्य एक शिष्य केदार डिचोलकर हा ‘लिटल चॅम्पस’ या शो मध्ये पोचला होता. सिद्धार्थ डिचोलकर या अन्य एका शिष्याने साम टिव्हीच्या ‘गुरुकुल’ या संगीत स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत गोमंतकीयांचे प्रतिनिधीत्व केले होते. रजत मिश्रा या विद्यार्थ्यांने आकाशवाणीच्या राष्ट्रीय स्पर्धेत गझल विषयात सुवर्णपदक पटकावले होते. तसेच हेतवी सेठीया या विद्यार्थीनीने सुगम संगीत प्रकारात राष्ट्रीय पातळीवर रौप्य पदक प्राप्त केले होते.
विद्यार्थ्यांनी सूर, ताल, शिकून मोठे व्हावे आणि राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवावा यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे गुरुवय मठकर यांनी सांगितले. सध्या नवाब शेख संगीताच्या बळावर कलर्स टिव्हीच्या ‘सूर नवा ध्यास नवा’ या रिएलिटी शोमध्ये आश्वासक गायन करीत असल्याने केवळ वास्को शहरातील संगीत प्रेमींच नव्हे तर संपूर्ण गोमंतकीयांच्या गळय़ातील तो ताईत बनला आहे.