रेव्ह पाटर्य़ांवर बंदी घालणारा कायदा सादर
वृत्तसंस्था/ रोम
इटलीतील पहिल्या उजव्या विचारसरणीच्या पंतप्रधान ठरलेल्या जॉर्जिया मेलोनी या केवळ 2 आठवडय़ांमध्येच वादग्रस्त ठरल्या आहेत. वादांचे कारण मेलोनी सरकारचे निर्णय ठरले आहेत. मेलोनी यांनी नाझी आर्मबँड परिधान करणारे नेते गलैजो बिग्नामी यांना मंत्रिपद दिले आहे. बिग्नामी यांना इटलीच्या राजकारणातील अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्व मानले जाते. तसेच आणखी एका निर्णयात रेव्हसारख्या पाटर्य़ांवर बंदी घालण्याचा कायदा लागू केला आहे.
या कायद्यामुळे रेव्ह पार्टी आणि अवैध डीजे म्युझिक पार्टीवर बंदी येणार आहे. तसेच आयोजकांना 3-6 वर्षांची शिक्षा होणार आहे. अशाप्रकारच्या आयोजनांमुळे अमली पदार्थांचे सेवन आणि लैंगिक गुन्हा होण्याची शक्यता वाढत असल्याचा सरकारचा युक्तिवाद आहे.
या निर्णयांमुळे घटनेकडून प्राप्त नागरिकांच्या अधिकारांवर संकट आल्याचे तज्ञांचे मत आहे. या कायद्याच्या अस्पष्ट व्याख्येमुळे याच्या आड अन्य सार्वजनिक सभा रोखल्या जाण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धोका निर्माण होत सामूहिक कार्यक्रम आयोजित करणे अवघड ठरणार असल्याची चर्चा आहे.
हे निर्णय गंभीर मुद्दय़ांवरून लक्ष विचलित करण्यासाठी घेण्यात आल्याचेही बोलले जात आहे. इटलीची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. अशातच देशात महागाई वाढत असून विजेचे बिल कमी करण्याचे आश्वासन पूर्ण करणे अवघड ठरले आहे. मेलोनी या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या होत्या.