पुणे / प्रतिनिधी :
शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमचे नेते असल्याचे विधान केले असले, तरी त्यांच्या विधानानंतर कुणीही संभ्रमात राहण्याची गरज नाही. संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष महायुतीसोबत आहे, असा दावा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला.
सामंत शुक्रवारी पुण्याच्या दौऱ्यावर होते. त्या वेळी बोलताना ते म्हणाले, शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आमचे नेते असल्याचे व पक्षात कोणतीही फूट पडली नसल्याचे विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्या विधानानंतर कुणीही संभ्रमात राहण्याची गरज नाही. अजित पवारांनी यापूर्वीच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी महायुतीसोबत असून, त्याबाबत शंका घ्यायचे कारण नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली का? या विषयावर उदय सामंत म्हणाले, दुसऱ्या पक्षावर बोलण्याचा मला अधिकार नाही. मी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम केले आहे. पक्ष सोडल्यानंतर नेत्यांवर तोंडसुख घेणाऱ्यांपैकी मी नाही. पण पिंपरी चिंचवडमध्ये ज्या पध्दतीने अजित पवारांचे स्वागत होत आहे, ते न भूतो न भविष्यती असे आहे.