माथेफिरु युवकाच्या कृत्यामुळे दहशत : पीडितांची होणार एचआयव्ही चाचणी
वृत्तसंस्था / पॅरिस
फ्रान्समध्ये सुईद्वारे हल्ला (नीडल अटॅक्स) करण्याचा आरोप एका 20 वर्षीय युवकावर झाला आहे. दक्षिण फ्रान्समध्ये अशा अनेक घटना समोर आल्यावर या युवकाला अटक करण्यात आली आहे. टौलॉनच्या रिवेरा बीचवर एका संगीत कार्यक्रमाच्या चित्रिकरणादरम्यान 20 महिलांनी सुईच्या हल्ल्यात जखमी झाल्याचे कळविले होते. एका महिलेला सुईद्वारे झालेल्या हल्ल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना समोर येताच खळबळ उडाली आहे. दोन महिलांनी संशयिताची ओळख पटविली आहे. या आरोपीवर गंभीर आणि पूर्वनियोजित सशस्त्र हिंसेचा आरोप ठेवण्यात आला आहे.
नीडल अटॅकची देशात आतापर्यंत 100 प्रकरणे समोर आली आहेत. या हल्ल्यांद्वारे युवतींना लक्ष्य करण्यात येत आहे. हल्ल्यातील पीडित युवतींमध्ये चक्कर येणे, अंगदुखी अशी लक्षणे दिसून येत आहेत. कुठल्या प्रकारची सुई टोचली जात आहे हे माहित नसल्याने या हल्ल्याबद्दल लोक घाबरले आहेत.
संगीत महोत्सवाच्या चित्रिकरणादरम्यान नव्या घटना आढळून आल्या आहेत. पूर्व फ्रान्सच्या बेलफोर्टमध्ये एका महोत्सवादरम्यान 17-18 वयोगटातील 6 मुलींनी हात आणि खांद्यांमध्ये अचानक तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केली आहे. तर 7 मुलींनी चित्रिकरणादरम्यान नीडल अटॅक झाल्याची तक्रार केली आहे. बेलफोर्टमध्येच संशयिताला अटक करण्यात आली होती. देशातील विविध शहरांमधून अशाप्रकारची प्रकरणे समोर येत आहेत. बहुतांश पीडितांना रक्त चाचणी करण्यास सांगण्यात आले आहे. काही जणांना एचआयव्ही आणि हेपटायटिस प्रतिबंधक औषधे देण्यात आली आहेत.