वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
न्यूझीलंड आणि विंडीज यांच्यात होणाऱया आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज मॅट हेन्री बरगडय़ांना झालेल्यांना दुखापतीमुळे खेळू शकणार नाही, असे क्रिकेट न्यूझीलंडच्या प्रवक्त्याने सांगितले.
गेल्या आठवडय़ात न्यूझीलंडचा संघ सराव करीत असताना हेन्रीला या दुखापतीच्या वेदना जाणवू लागल्या. त्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय इलाज करण्यात आला. पण त्याच्या वेदनामध्ये कोणताही फरक जाणवत नसल्याने त्याने या मालिकेत खेळणार नसल्याचे कळविले. आता या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघात हेन्रीच्या जागी नवोदित बेन सिरेसचा समावेश करण्यात आला आहे. सिरेस या आगामी मालिकेत आपले वनडे पदार्पण करेल. न्यूझीलंडचा संघ सोमवारी बार्बाडोसला प्रयाण करेल. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2 सप्टेंबरपासून तीन सामन्यांची चॅपेल-हॅडली चषक वनडे क्रिकेट स्पर्धा खेळविली जाणार आहे.
न्यूझीलंड संघ- केन विलियमसन (कर्णधार), ऍलेन, बोल्ट, ब्रेसवेल, कॉनवे, फर्ग्युसन, ग्युप्टील, लॅथम, मिचेल, निश्चाम, फिलिप्स, बेन सिरेस, सँटेनर, सोधी आणि साऊदी.