|Sunday, September 22, 2019
You are here: Home » क्रिडा » बीसीसीआय अध्यक्षपदासाठी गांगुली आघाडीवर?

बीसीसीआय अध्यक्षपदासाठी गांगुली आघाडीवर? 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाने अनुराग ठाकुर यांची उचलबांगडी केल्यानंतर माजी भारतीय कर्णधार सौरभ गांगुली बीसीसीआय अध्यक्षपदासाठी आघाडीवर असल्याचे वृत्त आहे. मात्र, त्याची निवडही सहज पद्धतीने होणे कठीण असल्याचे संकेत आहेत. सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ विद्यमान 5 उपाध्यक्षांमधून अध्यक्षपदी कोणाला निवडायचे, यावरुन पेचात आहे. केवळ सांख्यिकी लक्षात घेता, तूर्तास, दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटनेचे (डीडीसीए) पदाधिकारी, मध्य विभागातून उपाध्यक्ष सी. के. खन्ना हे सर्वात अनुभवी आहेत. मात्र, दिल्ली संघटनेचे निरीक्षक निवृत्त न्या. मुकूल मुदगल यांनी खन्ना हे अपायकारक प्रभाव टाकण्यात माहीर असल्याचे आपल्या अहवालात नमूद केले आहे.

खन्ना यांच्याशिवाय, आसाम क्रिकेट संघटनेचे गौतम रॉय अनुभवी असून उपाध्यक्षपदाची त्यांची ही दुसरी टर्म आहे. 2000 ते 2015 या कालावधीत ते आसाम क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राहिले आहेत. अर्थात खन्ना व रॉय मागील दशकभराहून अधिक काळ आपापल्या मंडळाच्या अध्यक्षपदावर कार्यरत असल्याने त्यांनी सक्तीने अध्यक्षपद सोडावे लागणार आहे. आंध्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष जी. गंगा राजू यांच्यासमोरही अशीच स्थिती आहे.

दरम्यान, बीसीसीआय अध्यक्षपदी कोण असावा, या चर्चेत माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी गांगुलीला पसंती दिली. मात्र, गांगुली मंडळाच्या उपाध्यक्षपदी नसल्याने त्याला बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाचा 3 वर्षांचा कालावधी पूर्ण करावा लागेल का, हे देखील अद्याप गुलदस्त्यातच आहे.