|Sunday, December 15, 2019
You are here: Home » भविष्य » मेष

मेष 

राशिचक्रातील अत्यंत महत्त्वाची पहिली रास. अत्यंत उत्साही, मनभावी, कोणत्याही कार्यात आनंदाने भाग घेणारी ही रास आहे. या वर्षात बरेच महत्त्वाचे बदल घडणार आहेत. ग्रहस्थितीचा योग्य वापर करून घेतल्यास जीवनातील बऱयावाईट घटनांचा आढावा समजू शकेल. मुलाबाळांसाठी काहीही करण्यास ही माणसे केव्हाही तयार असतात. परिस्थिती पाहून कसे निर्णय घ्यावेत, हे याच व्यक्तींकडून शिकावे. मनातील योजना या लोकांनी प्रत्यक्षात आणल्यास त्यांच्याइतके भाग्यवान तेच. जितके धाडसी तितकेच भित्रेही असतात. देवांचे वैद्य अश्विनीकुमार तसेच शनिची कृपा असणारी ही रास आहे. मानसिक संवेदनावर नियंत्रण ठेवल्यास मोठे यश संपादन करू शकाल.


कोणत्याही गाडीचा पहिला गियर किंवा स्टार्टर ‘मेष’रास आहे. घात नक्षत्राच्या वारीही कोणतेही काम यशस्वी करून दाखविण्याची धमक या राशीत आहे. अति उतावळेपणा, काहीवेळा घातक ठरत असल्यामुळे महत्त्वाच्या बाबीत विचारपूर्वक पावले टाकणे आवश्यक असते. पाश्चात्य रीतीप्रमाणे दरवषी  15 एप्रिल ते 15 मे  या काळावर या राशीचे प्रभुत्व असते. अत्यंत महत्वाकांक्षी, काहीही करून ध्येय गाठणे हा या राशीचा गुण असून काहीवेळा आत्मकेंद्रित असल्यामुळे स्वत:ची जीवनशैली  स्वत: ठरवतात. शक्मयतो आपल्या विचारावर या व्यक्ती ठाम असतात. काम सुरळीत होण्यात नेहमी अडचण येणे यासारखे दोष आढळतात. या राशीला जन्मजात दैवी कृपा लाभलेली आहे. कोणतेही काम हसत खेळत आनंदाने करणे हा यांचा स्थायीभाव आहे. मित्र फार लवकर जोडतील, काहीवेळा उत्तम नेतृत्वही करू शकतात. परंतु कार्यक्षमतेत कोठेतरी कमी पडणारी ही रास आहे. सतत काहींना काही प्रयत्न करण्याची धडपड असते. नोकरी, व्यवसाय किंवा करिअर निवडताना यांचा नेहमी गोंधळ उडतो. क्षमतेपेक्षा अधिक मोठी जबाबदारी स्वीकारण्याच्या वृत्तीमुळे ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी स्थिती दिसून येते. धनू व सिंह या राशींच्या संपर्कात या राशीच्या लोकांची प्रगती जोरात होऊ शकते. या वर्षांची संक्रात अश्विनी नक्षत्राला किंचित त्रासदायक ठरेल. भरणी व कृतिका नक्षत्राला मोठय़ा प्रमाणात धनलाभ होईल.

धांदरटपणा, घाईगडबड, पुढे पुढे करण्याची हौस, लहरीपणा, दुर्दम्य उत्साह, आनंदी वृत्ती, अतिउष्णता व पित्त यांचा संगम. अश्विनी नक्षत्राचे दिव्यत्व, भरणी नक्षत्राची समृद्धी, कृत्तिका नक्षत्राचा मानीपणा व आकर्षकपणा घेऊन ही रास आलेली आहे. कोणत्याही महत्त्वाच्या कामाची सुरुवात या राशीतील काही नक्षत्राच्या व्यक्तीच्या हातून केल्यास त्यात चांगले यश मिळते. वैभवलक्ष्मी, वैद्यकशास्त्र, मोटारवाहनाशी संबंधित ऑटोमोबाईल इंजिनियरिंग तसेच वाहन चालविण्यात या लोकांचा हात कुणी धरू शकणार नाही. कितीही अवघड व कोणत्याही कामाचे नियोजन करावे तर याच राशीच्या लोकांनी असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. बुद्धिमत्ता व चातुर्य असूनही केवळ चंचलपणामुळे ही माणसे मागे पडतात. प्रत्येक गोष्टीत पुढाकार घ्यायची वृत्ती असते. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास जीवनाचे सोने करू शकाल. राग, अति उष्णता व पित्त यावर तुम्ही नियंत्रण ठेवल्यास जीवनात बरेच काही साध्य करू शकाल.

ज्योतिषशास्त्राची गूढ भाषा लोकांना नको असते. लोकांना फक्त ग्रहांचा रागरंग कसा असतो व त्यांची फळे कशी मिळणार यात अधिक रस असतो. वाचकांची ही नाडी ओळखून ज्योतिषशास्त्राची पाल्हाळीक क्लिष्ट भाषा शक्यतो टाळून 2017 चा महिनावार आढावा.

 

या वषीची ग्रहणे- 10 फेबुवारीला होणारे छायाकल्प चंद्रग्रहण चतुर्थात होत आहे. कौटुंबिक स्थानात कोणतेही ग्रहण शुभ नसते. त्यामुळे घरगुती वातावरण बिघडू नये याची दक्षता घ्यावी. 7 ऑगस्टचे खग्रास चंद्रग्रहण दशमस्थानी होत असून ते सर्व बाबतीत शुभफलदायी आहे. नोकरी व्यवसायात महत्त्वाच्या शुभ घटना घडतील. बेरोजगारांना नोकरी मिळू शकेल. तसेच काही नवीन बदलही घडण्याची शक्मयता आहे. नवीन व्यवसायाची सुरुवात होऊ शकेल. यावषी शनिचे भ्रमण 9 जानेवारी ते 20 जूनपर्यंत भाग्यस्थानात राहणार आहे. गेल्या अडीच वर्षातील बरेच त्रास कमी होतील. महत्त्वाची कामे होऊ लागतील. त्यानंतर शनि पुन्हा आठवा येत आहे, हा काळ थोडा त्रासदायक ठरेल. आरोग्याची काळजी घ्यावी. वक्री शनिची फळे थोडी कडक असतात. त्यामुळे थोडे जपावे. कोणत्याही बाबतीत अतिरेक करू नये.

7 एप्रिलला हर्षल तुमच्या राशीत येईल. मंगळ, बुध, हर्षल योग हा अत्यंत चमत्कारिक योग असून या योगावर मानसिक चंचलता वाढते. स्फोटक द्रव्यापासून सावध रहा. या हर्षलचा परिणाम आगामी सात वर्षापर्यंत राहिल. वैचारिक मतभेद होतील. कोणतेही विचार स्थिर राहणार नाहीत पण बौद्धिकदृष्टय़ा चांगले फळ, मनात जे आणाल, ते केल्याशिवाय राहणार नाही. अचानक जे काही कराल त्यात मोठे यश मिळेल. मानसिक संतुलन काहीवेळा बिघडण्याची शक्मयता. वैवाहिक जीवनावर या हर्षलचा काही प्रभाव पडू देऊ नका. शिक्षणात येणारे अडथळे दूर होतील. बुद्धी प्रगल्भ होईल.


 

जानेवारी 2017- या महिन्यात 26 तारखेस शनि भाग्यात येत आहे. जीवनाला कलाटणी देणारा हा योग आहे. गेल्या अडीच वर्षात झालेले काही त्रास कमी होतील. शुभ कामासाठी प्रवास घडतील. सज्जन लोकांचा सहवास लाभेल. बुवाबाजी व ढोंगी व्यक्तीपासून नुकसान होईल. सरकार दरबारी अथवा परदेशी संबंधित व्यापार अथवा व्यवहार असतील तर यश मिळवाल. वडिलोपार्जित मालमत्तेसंदर्भात काही महत्त्वाच्या वाटाघाटी सुरू होतील. राजकारणाची आवड असेल तर त्यात जाण्याच्या संधी येतील. पुढारीपणा गाजविण्याचा योग येईल. वडिलांचा व्यवसाय असेल तर तो वाढविण्यास अनुकूल काळ. भावंडांशी वादविवाद होण्याची शक्यता पण शक्यतो मतभेद टाळण्याचा प्रयत्न करा. मंगळ, शुक्राची युती काही नवी प्रेमप्रकरणे निर्माण करील. सावध राहणे चांगले. उच्च शिक्षणासाठीच्या प्रयत्नात यश प्राप्ती.


फेब्रुवारी- खाण्यापिण्याच्या बाबतीत शक्यतो काळजी घ्या. दीर्घकाळ चालू असलेले शत्रुत्व संपुष्टात येईल. हर्षल, शुक्र, मंगळाची युती विचित्र आहे. चैनीसाठी अनाठायी खर्च होईल. थट्टा-मस्करी करताना जपून रहा. सरकारी कामे पूर्ण करून घ्या. आर्थिक स्थिती उत्तम राहील. माघी पौर्णिमा सुखस्थानी आहे. कौटुंबिक जीवनात महत्त्वाचे फेरबदल घडतील. 26 तारखेची अमावस्या अनेक बाबतीत लाभदायक ठरेल. पूर्वार्जित मालमत्तेवरून काहीजण नको ती प्रकरणे उकरून काढण्याची शक्यता आहे. तुमचा उत्कर्ष सहन न होणारे काही शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील. तसेच काही जवळचे मित्र ऐनवेळी अडचणीत आणण्याची शक्यता आहे. अवास्तव खर्च आणि कर्ज प्रकरणे यापासून दूर राहिल्यास चांगले. महाशिवरात्री  नोकरी व्यवसायाच्या बाबतीत  शुभ ठरेल.


मार्च – मंगळ लक्ष्मीयोगात आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती उत्तम राहील. सतत हाती पैसा येत राहील. नोकर-चाकर ठेवण्याची क्षमता प्राप्त. समाजात वजन वाढेल. बऱयाच महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. मोठमोठय़ा उलाढाली करून त्यात बऱयापैकी पैसा कमवाल. बुधाचे भ्रमण शुभ नसल्याने कागदोपत्री घोटाळय़ात अडकणार नाही, याची काळजी घ्या. भाग्योदय, संततीसौख्य या बाबतीत अनुकूलता लाभेल. तुमच्या कर्तबगारीला वाव मिळेल. घरदार आणि वाहन या बाबतीत आपण भाग्यवान ठरू शकाल. या महिन्यात साक्षी पुरावे, जामिनकी यापासून जपावे लागेल. काही नवीन मशिनरी विशेषत: घरगुती छोटी पिठाची गिरणी असेल तर आर्थिक बाबतीत काळजी घ्या. होळी पौर्णिमा पंचमात होत आहे. एखादे न होणारे काम होऊन जाईल. सोमवती अमावस्या मानसिक स्थिती अस्वस्थ  ठेवण्याची शक्यता आहे.


एप्रिल- बाराव्या रविचा त्रास उत्तरार्धात संपेल. त्यानंतर महत्त्वाची मोठी कामे होऊ लागतील. सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. सामाजिक क्षेत्रात असाल तर प्रतिष्ठा मिळेल. कुटुंबाची उन्नती होईल. कोणतेही व्यसन आणि व्यसनी व्यक्तिपासून दूर राहिल्यास बरीच मोठी कामे होतील. परदेश प्रवासाच्या संधी येतील. शिक्षणाशी काहीही संबंध नसेल अशा क्षेत्रात नोकरी मिळण्याची शक्यता. मंगळ धनस्थानी आहे. प्राप्ती आाणि खर्च यांचा ताळमेळ बसणे कठीण. इंजिनिअरिंग क्षेत्र, कारखानदारी, जमीनजुमला यातून मोठा फायदा होईल. ग्रहांचे काही विशिष्ट योग या महिन्यात तुमच्या जीवनाला शुभकलाटणी देतील. मागील काही अडचणी कमी होऊ लागतील. किचकट प्रसंगात तुम्हाला मध्यस्थीसाठी बोलावणे येईल. पण तुम्हाला जपून रहावे लागेल.


मे- मौल्यवान वस्तू खरेदी कराल. असलेला पैसा खर्चून टाकणे आणि निष्काळजीपणामुळे मालमत्तेसंदर्भात घोटाळे उद्भवणे असे प्रकार घडतील. मंगळाचे भ्रमण, डोळय़ांचे विकार, वात, उष्णता यामुळे तब्येतीवर परिणाम होईल. भावंडाशी मिळूनमिसळून वागल्यास आर्थिक प्रगती सुरू होईल. हॉटेल व्यवसाय सुरू केल्यास उत्तम चालेल. एखादा कारखाना चालविण्याची संधी मिळाल्यास ती नाकारू नका. मोठय़ा भावाच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. विवाहाच्या वाटाघाटी सुरू असतील तर अत्यंत सावध रहावे लागेल. दिखावा आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यात बराच फरक असलेला दिसेल. 26 तारखेनंतर परिस्थितीला अनुकूल वळण मिळेल. काही व्यावसायिक आडाखे बदलावे लागतील. ज्याचे काहीही ज्ञान नसेल अशा क्षेत्रात प्रवेश करून त्यात यशस्वी व्हाल.


जून- पराक्रमातील मंगळाचा शनिशी होणारा प्रतियोग कामाची जिद्द वाढवील. स्वत:च्या कष्टाने मोठे यश मिळवाल. भावंडांसाठी मदत कराल. पण  त्यांच्याकडून कोणत्याही आशा अपेक्षा करू नका. कितीही मोठे शत्रू असले तरी ते नामोहरम होतील. तुमच्यामुळे सासरच्या घराण्यावरील संकट टळेल. दुर्घटना व आजार यातून बचाव होईल. मित्र-मैत्रिणीचे सहकार्य उत्तम राहील. प्रतिष्ठित व्यक्तिंच्या नादी लागून नको त्या कल्पना उरी बाळगू नका. काही लोकांच्या बोलण्या-वागण्यात बराच फरक दिसून येईल. घाईगडबडीत स्वत:च्या चुकीनेच महत्त्वाचे काम बिघडण्याची शक्यता आहे. शस्त्रास्त्रे आणि तीक्ष्ण वस्तू जपून हाताळा. बुधाचे भ्रमण शुभ असल्याने एखादी एजन्सी वगैरे मिळण्याची शक्यता आहे. इतरांचे न ऐकता स्वत:च्या मनाने जे कराल, ते यशस्वी होईल. स्थलांतराच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे.


जुलै- शुक्र धनस्थानी आहे. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा परतावा मिळेल. मौल्यवान वस्तुंच्या व्यापारात मोठा फायदा मिळेल. संगीत, गायन, वादन, कलाक्षेत्र यात प्राविण्य मिळवाल. कौटुंबिक जीवनात बरेच चढउतार जाणवतील. राहत्या जागेत बदल होण्याची शक्यता. जागेच्या व्यवहारात सावधानता बाळगा. फसवणूक होण्याची शक्यता. शनि वक्र गतीने अष्टमात  असल्याने सर्व तऱहेच्या अपघातापासून जपा. कोणाला तरी मदत करायला जाल पण नको त्या आरोपात अडकाल. काही चुकांमुळे नोकरीत पदोन्नती ऐवजी अवनती होण्याची शक्यता. सरकारी क्षेत्रात असाल तर लाचलुचपत व भ्रष्टाचार याद्वारे नको ती संकटे ओढवून घ्याल. शक्यतो सरळ मार्गाने जाणे चांगले. घाईगडबडीत कोणत्याही कागदपत्रावर सही करू नका. ध चा मा होण्याची शक्यता आहे.


 ऑगस्ट- शुक्राचे भ्रमण दूरवरचे प्रवास योग व नव्या ओळखीतून धनलाभ घडवील. भावंडाचे सहकार्य उत्तम राहील. चतुर्थातील रवि, मंगळ कौटुंबिक जीवनात थोडीशी धूसफूस निर्माण करील. वैचारिक मतभेदाची शक्यता. आरोग्याच्या तक्रारी राहतील. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. काही कारणाने विस्कटलेले व्यवहार पुन्हा जुळण्याची दाट शक्यता आहे. पूर्वी जर एखाद्याला मदत केली असेल तर ऐनवेळी त्याचा तुम्हाला उपयोग होईल. सरकार दरबारी अडकलेली रक्कम परत मिळू शकेल. चार चाकी वाहन घेण्याचा योग येईल. एखाद्याचे लग्न फिसकटले असेल अथवा नोकरी सुटली असेल तर तुमच्या मध्यस्थीने त्यांचे जीवन सुधारू शकेल. या महिन्यात वडिलांच्या नावाने एखादा व्यवसाय सुरू केल्यास तो जोरात चालेल. मांसाहार आणि व्यसन यापासून दूर राहिल्यास बऱयाच अडचणी कमी होतील. 15 ऑगस्ट नंतर शैक्षणिक बाबतीत प्रगती.


सप्टेंबर- सट्टा, लॉटरी, शेअर मार्केट याद्वारे नशीब आजमावण्यास हरकत नाही. राहू, केतूचे स्थलांतर अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. चतुर्थातील राहू अनेक बाबतीत मोठे यश देणारा आहे. पण घराण्यातील तीन पिढय़ांचे दोषही जागृत होतील. त्यासाठी पूर्वजांचे श्राद्धकर्म व्यवस्थित ठेवा. वास्तुमध्ये कोणतेही दोष राहणार नाहीत, याची काळजी घ्या. नको असलेल्या अनावश्यक प्लास्टीकच्या वस्तू किंवा अडगळ काढून टाका. घरात धार्मिक वातावरण ठेवा. त्यामुळे राहुचे कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत. काही अनाकलनीय घटना घडू शकतात. कोणताही व्यापार अथवा व्यवसाय सावधानतेने करा. शनि, मंगळाचा केंद्रयोग संघर्षात्मक वातावरणास प्रोत्साहन देणारा आहे. त्यासाठी वादावादीचे प्रसंग टाळावेत. पण कारखानदारी, मोठमोठे उद्योग व अवघड कामात कष्ट व चातुर्य यांच्या जोरावर मोठे यशही मिळवून देईल.


ऑक्टोबर- गुरुचे सप्तमात झालेले आगमन मंगलकार्याच्या बाबतीत अतिशय चांगले आहे. विवाहाच्या वाटाघाटी सुरू होतील. वैवाहिक सौख्यात वाढ होईल. भागीदारी व्यवसाय करणार असाल तर चांगला काळ आहे. काहीजणांना दूरवरचे प्रवास घडतील. कोर्टप्रकरणे असतील तर त्यात यशस्वी व्हाल. किरकोळ कारणामुळे गैरसमज होऊ देऊ नका. भाऊबंदकीचे व्यवहार असतील तर त्यात तडजोडीने यश मिळवाल. अत्यंत कठीण परिस्थितीतूनही मार्ग काढाल. रहात्या जागेसंदर्भातील काही प्रश्न मिटतील. बरेच दिवस रेंगाळलेले एखादे मोठे काम या महिन्यात होईल. दूरवरचे प्रवास घडतील. व्यवसाय उद्योगात सरकारी अधिकारी, विजेचा खेळखंडोबा व कामगारांच्या समस्येमुळे तणाव वाढेल. बनावट नोटा, कागदपत्रातील घोटाळे, चुकीच्या अथवा कमी वस्तू वापरल्याने कडाक्याचे वादविवाद होतील. काळजी घ्यावी. मित्र असो व इतर… कुणालाही चुकूनही जामीन देऊ नका. अथवा कुणाच्या बाजूने साक्ष देऊ नका. यावर्षी गुरुचरित्राचे वाचन, मंत्र जप, सतत चालू ठेवा. त्याचा उपयोग होईल. तसेच कुलदेवतेची आराधना सतत चालू ठेवा. बनावट रत्ने व वास्तुशास्त्राच्या मागे लागू नका. तुमची चांगली वागणूक तुमचा भाग्योदय करणार आहे, हे लक्षात ठेवावे.


नोव्हेंबर- या महिन्यात कालसर्प योगाचा प्रभाव दिसून येईल. त्यामुळे योजलेले काम वेळेत होईलच असे नाही. सहाव्या मंगळामुळे आर्थिक लाभ होत राहतील. शत्रुपिडा कमी होतील. रवि, गुरु, शुक्राच्या शुभयोगामुळे वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहिल. पण शुक्र, हर्षल प्रतियोग काही गंभीर चुका घडण्याचे योग दर्शवतो. मोबाईल वा तत्सम इलेक्ट्रॉनिक वस्तू कोणाच्याही हातात पडू देऊ नका. तसेच कोणालाही त्याचा गैरवापर करू देऊ नका. इतर बाबतीत हा महिना शुभ ठरेल. दर्श अमावास्या अष्टमस्थानी होत असून आरोग्याच्या बाबतीत जपावे लागेल. वादावादी व मतभेद यांना धारा देऊ नका. 26 नोव्हेंबरला त्यात येणारा शुक्र अचानक धनलाभाचे योग घडवेल.


डिसेंबर – धनस्थानी होणारी पौर्णिमा आर्थिक व्यवहारात उत्तम यश मिळवून देणारी होईल. रवि, शनि योग मंगलकार्यात विघ्ने व प्रवासात अडचणी दर्शवितो.  सार्वजनिक वा विवाह समारंभात थट्टामस्करी अंगलट येईल. निष्कारण बदनामी  होण्याचे योग. नोकरी व्यवसायात सरळ मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. 18 तारखेची अमावास्या एखाद्या गंभीर प्रसंगातून सुटका करेल. परंतु आर्थिक बाबतीत काही घोटाळे निर्माण करेल. त्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. अनावश्यक खरेदीला 20 डिसेंबरला भाग्यात येणारा शुक्र वस्त्रप्रावरणांची खरेदी करावयास लाभेल. मंगल कार्यात भाग घ्याल. एखादा नवीन उद्योग सुरू करण्याची संधी मिळेल. 20,21, 22 दरम्यान उत्तरायणाच्या प्रभावामुळे जीवनात महत्त्वाच्या घटना घडतील. नवे स्नेहसंबंध जुळण्याची शक्मयता.

 

शुभेच्छा!!!

2017  हे नववर्ष आपणा सर्वांना सुखसमृद्धी, आयुरारोग्य, सुविद्या, सौभाग्य, मांगल्य, ऐश्वर्य व प्रसन्नता प्राप्त करून देवो. आम्हा सर्वांकडून सर्वांना सदिच्छा, हार्दिक शुभेच्छा व अभिष्टचिंतन!!

Related posts: