|Sunday, December 15, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » बेंगलोरसह राज्यात महिला कितपत सुरक्षित?

बेंगलोरसह राज्यात महिला कितपत सुरक्षित? 

एकामागून एक अशा येणाऱया समस्यांच्या गर्तेतून कर्नाटक सरकारला बाहेर पडता येत नाही अशी स्थिती आहे. एकीकडे आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी करावी लागणारी धडपड आणि दुसरीकडे महिला सुरक्षिततेवर होणाऱया दुर्लक्षामुळे उठलेली टीकेची झोड या दोन्हींची कसरत करतच सरकारची वाटचाल सुरू आहे.

 

मुलींना गर्भामध्येच मारणे, मुलगा म्हणजेच वंशाचा दिवा. या मानसिकतेतून बाहेर न पडणे, स्त्री साक्षर झाली की, पुरुषांना असुरक्षितता वाटणे या मानसिकतेतून जिथे शक्मय आहे तिथे स्त्रियांचे दमन करणे ही एक नवी संस्कृती रुजत चालली आहे. पुरुषप्रधान समाज व्यवस्थेत स्त्रियांना प्रत्येक ठिकाणी दुय्यम वागणूक दिली आहे. ‘यत्र नार्यस्तू पूज्यंते,’ असे एका बाजूला आपली संस्कृती सांगते आणि दुसरीकडे ‘न स्त्री स्वातंत्र्य मर्दती’, असेही सांगते. त्यामुळे या देशातील महिलांचे प्रश्न एक गहू पुढे पुढे सरकतात व अडीच गहू मागे येतात अशी आहे. आपण आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारत आहोत. परंतु विचाराने मात्र आपण कधी आधुनिक होणार याचे उत्तर कोणीच देऊ शकत नाही. राजकारणात तर साधन शुचिता राहिलेलीच नाही असे महिलांच्या संदर्भात पुरुष राजकारण्यांनी वाहिलेली मुक्ताफळे पाहता खेदाने म्हणावेसे वाटते. राजकारण हे एखाद्या वारांगनेप्रमाणे आहे. असे एखाद्या नेत्याने म्हणणे, भंवरीदेवीवर ब्राह्मण बलात्कार करू शकत नाहीत असा निकाल देणे किंवा महिलांनी तोकडे कपडे वापरल्याने त्यांच्यावर अत्याचार होतात अशी मुक्ताफळे अबू आझमी यांनी उधळणे म्हणजे स्त्रियांबद्दलची मानसिकता व अनादर अधोरेखित होतो. 31 डिसेंबर रोजी रात्री सिलिकॉन सिटी बेंगळूर येथे नववर्षाच्या स्वागतासाठी जल्लोष होता. मध्यरात्री एम. जी. रोड आणि ब्रिगेड रोड या प्रमुख मार्गांवर नशेबाजांनी तरुणींची छेडछाड करून त्यांना धक्काबुक्की केली. संपूर्ण देशभरात या घटनेचा निषेध केला जात आहे. गर्दीत अशा घटना होणारच असे सांगत कर्नाटकाचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्नाटकाच्या राजधानीत अशा घटना वारंवार घडू लागल्या आहेत.

राष्ट्रीय महिला आयोगाने समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी आणि कर्नाटकाचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांना नोटीसा पाठवल्या आहेत. बेंगळूर येथील घटनेनंतर अबू आझमी यांनी तोकडे कपडे घालून फिरल्यास आणखी काय होणार? असे म्हटले आहे. खरे तर अशा घटना घडू नयेत यासाठी गृहखात्याने अधिक खबरदारी घ्यायला हवी होती. 31 डिसेंबरच्या रात्री राजधानीत 1500 पोलीस गस्तीवर होते. नववर्षाच्या जल्लोषात सहभागी झालेल्या प्रत्येकालाच आम्ही सुरक्षा पुरवू शकत नाही असे सांगून पोलीस दलातील वरि÷ अधिकाऱयांनी हतबलता व्यक्त केली आहे. प्रत्येकाला सुरक्षा पुरवू शकत नाही ही गोष्ट खरी असली तरी जिथे गर्दी आहे त्या ठिकाणी तरी बारकाईने लक्ष ठेवता येणे शक्मय होते. एम. जी. रोड आणि ब्रिगेड रोडवर ज्या घटना घडल्या त्या पोलिसांसमक्षच घडल्या. गर्दीतील तरुणाईचा हिडीसपणा इतका वाढला की, पोलिसांना लाठीमार करून गर्दी पांगवावी लागली. एम. जी. रोड आणि ब्रिगेड रोड बेंगळूरचे हृदयभाग- ‘हार्ट ऑफ द सिटी’ असे समजले जातात. गार्डन सिटीला येणाऱया परदेशी नागरिकांबरोबरच देशभरातील वेगवेगळय़ा ठिकाणाहून बेंगळूरला येणारे प्रवासी या मार्गावरील चमक बघायला येतातच, इतके पर्यटकांना या परिसराचे आकर्षण आहे. पब, बार, डान्सबारची संख्याही याच परिसरात अधिक आहे. सध्या डान्सबारवर बंदी असली तरी या परिसरातील छम छम काही थांबलेली नाही. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री जो प्रकार घडला त्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर क्हायरल झाले आहेत. त्यामुळेच राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा महिलांसाठी बेंगळूर सुरक्षित आहे का हा प्रश्न आहेच परंतु महिलांसाठी राज्य तरी सुरिक्षत आहे का हाही प्रश्न आहेच.

एकीकडे महिलांना रात्रपाळी देण्याबाबत सरकारचा विचार सुरू आहे. मात्र त्यासाठीची आवश्यक ती सुरक्षितता महिलांना मिळणे बंधनकारक आहे. खरी गोची अशी आहे की, दिवसासुद्धा महिला निर्भयपणे वावरू शकत नाहीत, तेथे रात्रपाळीचे काम त्यांना देण्याचा प्रयोग यशस्वी होईल का? बेंगळूर येथील कॉल सेंटरमध्ये परराज्यातील हजारो तरुणी काम करतात. काम संपवून घरी जाताना आपण सुरक्षितपणे घरी जाऊ का याची टांगती तलवार घेऊनच तरुणी आणि महिला वावरतात. कारण कॉलसेंटरमधून घरी परतताना भररस्त्यावरून तरुणींना उचलून नेऊन त्यांच्यावर बलात्कार करण्याचे प्रयत्न झाले आहेत. अनेक महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे लोण केवळ बेंगळूरपुरते राहिले नाही तर ते राज्यात सर्वत्र पसरले आहे. दुसरीकडे तंत्रज्ञान जितके प्रगत होत चालले आहे तितके ते महिलांसाठी तापदायक होऊ लागले आहे. त्यांना अश्लील संदेश पाठविणे, रात्री अपरात्री फोन करणे, फोटो पाठविणे व वेगवेगळे व्हीडिओ व्हायरल करणे या सर्व प्रकारच्या महिला शिकार ठरत आहेत. राज्य सरकार सध्या अनेक समस्यांनी ग्रासले आहे. माजी मंत्री श्रीनिवास प्रसाद यांचा राजीनामा त्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश, मंगळवारी सकाळी सहकार मंत्री महादेव प्रसाद यांचे आकस्मिक निधन यामुळे मुख्यमंत्र्यांच्या म्हैसूर जिल्हय़ात काँग्रेससमोरील अडचणी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेवर लक्ष देण्यास सरकारकडे वेळ नाही आणि त्याचे गांभीर्यही दिसून येत नाही.

श्रीनिवास प्रसाद यांच्या राजीनाम्याने चामराजनगर विधानसभा मतदारसंघात आणि सहकार मंत्री महादेव प्रसाद यांच्या अकाली निधनाने गुंडलपेठ विधानसभा मतदारसंघात एक-दोन महिन्यातच पोटनिवडणूक होणार आहे. श्रीनिवास प्रसाद यांनी तर भाजपमध्ये प्रवेश करून सिद्धरामय्या यांना चांगलाच ‘प्रसाद’ दिला आहे.

या दोन्ही मतदार संघावर सध्या काँग्रेसची पकड आहे. त्याला सुरुंग लावण्याचे काम भाजप नेत्यांनी हाती घेतले आहे. एकामागून एक अशा येणाऱया समस्यांच्या गर्तेतून या सरकारला बाहेर पडता येत नाही अशी स्थिती आहे. एकीकडे आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी करावी लागणारी धडपड आणि दुसरीकडे महिला सुरक्षिततेवर होणाऱया दुर्लक्षामुळे उठलेली टीकेची झोड या दोन्हींची कसरत करतच सरकारची वाटचाल सुरू आहे. ‘गर्दीत अशा घटना घडणारच’ असे सांगत सारवासारव करण्यापेक्षा अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यातच सरकार आणि जनता या दोघांचेही हित आहे.

Related posts: