|Sunday, December 15, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » सात्त्विक वृत्तीचा नम्र अभ्यासक

सात्त्विक वृत्तीचा नम्र अभ्यासक 

तरुण पिढीमध्ये अभ्यासूवृत्ती आढळत नाही, असा आरोप केला जातो. पण असा आरोप करणाऱयांच्या शोधकवृत्तीच्या दृष्टीकडेच खरे तर संशयाने पहायला हवे. कारण आजच्या पिढीतही अनेक तरुण अभ्यासूवृत्तीने आपापल्या क्षेत्रात काम करताना आढळतात. एवढेच नाही, तर कामाच्या निष्ठेने अल्प कालावधीत आपल्या कामाचा ठसाही उमटवताना दिसतात. ज्येष्ठ संशोधक स्व. यशवंत सुमंत यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱया सन्मानाने साहित्याचे तरुण अभ्यासक डॉ. रणधीर शिंदे यांना नुकतेच गौरविण्यात आले, हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आपल्या जडण-घडणीच्या काळात आपण कोणाच्या सहवासात राहतो आणि कोणत्या विचारांना जोडून घेतो हे महत्त्वाचे असते. डॉ. शिंदे हे मूळचे सोलापूरचे. ज्येष्ठ समीक्षक डॉ. गो. मा. पवार हेसुद्धा सोलापूरचेच. त्यांचा सहवास त्यांना प्रारंभीच्या काळात लाभला. त्यानंतर डॉ. शिंदे कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात रुजू झाल्यावर त्यांनी कॉ. गोविंद पानसरे यांच्या कामाशी आणि त्यातून त्यांच्या कृतीशील विचाराशी जोडून घेतले. यातूनच मग त्यांचा कादंबरीकार राजन गवस, राज्यशास्त्राचे अभ्यासक अशोक चौसाळकर यांच्याशी स्नेह वाढत गेला. डॉ. शिंदे यांच्या नम्र आणि सात्विक वृत्तीमुळे त्यांच्यातील मूळ अभ्यासूवृत्तीला अधिकाधिक बळकटी मिळाली, ती याच कालावधीत. जे काम करायचे, ते निष्ठा आणि मनःपूर्वक. कोणत्याही गोष्टीची घाई नाही, की त्यामागे ‘हेतू संकल्प नाही…’ त्यामुळे त्यांनी आजवर केलेल्या कामामुळे साहित्याचा गंभीर अभ्यासक, अशी त्यांची प्रतिमा मराठी साहित्य विश्वात उभी राहिली. त्यांनी परिश्रमपूर्वक केलेल्या कामामुळेच त्यांची आजवर शरच्चंद्र मुक्तबोध : व्यक्ती आणि वाङ्मय, दिलीप चित्रे यांची कविता, दि. के. बेडेकर यांचा साहित्य अकादमीसाठी केलेला मोनोग्राफ, मध्य प्रदेशातील साहित्य यात्रा आदी स्वतंत्र ग्रंथ प्रकाशित झाले तसेच ‘निवडक राजन गवस, अण्णाभाऊ साठे : साहित्य आणि समीक्षा, युगांतरमधील अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, लक्षदीप : निवडक लक्ष्मीकांत देशमुख, अन्वयार्थ : लक्ष्मीकांत देशमुख यांच्या साहित्याची समीक्षा’ आदी संपादित ग्रंथही प्रसिद्ध झाले. या सगळय़ातूनच कविवर्य ना. धो. महानोर यांच्यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलेच परंतु डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली सध्या कार्यरत असलेल्या साहित्य अकादमीच्या सल्लागार मंडळावर, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक अभ्यास मंडळासह विविध नियतकालिकांच्या संपादन मंडळावर ते सध्या कार्यरत आहेत.

Related posts: