|Sunday, December 15, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ‘वंदे मातरम्’- एक क्रांतिकारक पाऊल

‘वंदे मातरम्’- एक क्रांतिकारक पाऊल 

भारताच्या इतिहासात देश उभारणीच्या दृष्टिकोनातून वैदिक काळापासूनच साधु-संतांचे, ऋषी-मुनींचे तसेच प्रत्येक क्षेत्रातील विचारवंतांचे मार्गदर्शन लाभत आले आहे. दि. 8 जानेवारी 2017 रोजी सायं. 4.30 वा. गोव्यातील श्रीक्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी महाराजांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली वंदे मातरम् हा कार्यक्रम होणार आहे… त्यानिमित्ताने…

राष्ट्रनिर्मितीच्या तसेच भारत देशाला विश्वगुरुपदी विराजमान करण्याच्या उद्देशाने चालू असलेली ही चळवळ आहे. देशाप्रति नितांत श्रद्धा असणे हा समाजाचा घटक म्हणून प्रत्येक देशवासियांचे आद्य कर्तव्य आहे. ‘वंदे मातरम्’ ही संकल्पना म्हणजे देशाला मातृत्व प्रदान करण्याची विचारधारा आहे, जी वैदिक काळापासून चालत आलेली आहे. अथर्ववेदामध्ये भूमीसूक्तामध्ये सांगितले आहे, आईमुळे ज्याप्रमाणे प्रत्येकाला शरीर प्राप्त होते म्हणून तिच्यात मातृत्व बघण्याची शिकवण आहे तसेच पंचतत्त्वापासून, प्रकृतीपासून शरीर निर्माण होते, त्यामुळे प्रकृतीतही मातृत्व बघण्याची शिकवण दिली आहे. या प्रकृतीचे संरक्षण करणे व वंदन करण्याची शिकवण ऋषी संस्कृतीने प्रदान केली आहे, म्हणूनच तर दिवसाची सुरुवात करत असताना भूवंदनेने करण्याचा उल्लेख धर्मशास्त्राrय किंवा पौराणिक ग्रंथांमध्ये आढळतो. इतिहासाचे सिंहावलोकन केल्यास मातृभूमी प्रति सन्मान, आदरभाव व अभिमान असल्याचे दाखले आपल्याला प्राप्त होतात.

जननी आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असल्याची शिकवण रामराज्यापासूनच देण्यात आली आहे. कालांतराने पाश्चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे आणि परप्रांतियांच्या आक्रमणामुळे गुलामगिरीत वावरत असलेल्या भारतीयांवर अमानुष आणि निर्दयी अत्याचार केले गेले. शारीरिक आणि मानसिक शोषण घडल्यामुळे भारतीयांची मने खजिल होत गेली आणि मतपरिवर्तन घडू लागले. हे अत्याचार कुठवर भोगावे लागणार? या मायभूमीचे तुकडे करू पाहणाऱया राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांवर उपाय काय? जाती, धर्म, पंथ यासारख्या मर्यादित विषयांमुळे विखुरलेल्या समाजाला संघटित करण्याचे उपाय काय, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी साधु-संतांनी, ऋषी-मुनींनी, धर्माचार्यांनी उपदेश करून क्रांतिकारी समाज निर्माण करण्याची सुरुवात केली. काही काळापुरता धर्मकार्यापेक्षाही देशकार्याला प्राधान्य दिल्याचे स्वातंत्र्य काळातील दाखले आपल्याला प्राप्त होतात. म्हणून वीर सावरकरांना ‘वेदमंत्राहुनही आम्हां वंद्य वंदे मातरम्’  असे म्हणावे लागले.

 भारत देश पारतंत्र्यात जाण्याच्या कारणांचा शोध ज्यावेळी घेतला गेला, त्यावेळी समाजातील विघटितपणा आणि मतमतांतरे हे प्रमुख कारण निदर्शनास येताना दिसते. या देशाची ही बिकट परिस्थिती बदलून नवराष्ट्र निर्माण करण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ते म्हणजे सळसळते रक्त असलेल्या या देशाच्या तरुणांमध्ये आहे, ही गोष्ट हेरून युवा समुपदेशन आणि युवा संघटन करण्याचे कार्य विचारवंतांनी आजतागायत केल्याचे आढळते. आजच्या 21 व्या शतकात देशातील होणाऱया घडामोडींवर लक्ष दिल्यास असे जाणवते भारत जरी स्वतंत्र असला तरी वैचारिक दृष्टीने आजही गुलामगिरीत वावरतानाचे चित्र आढळून येते.

 कित्येकदा विचारवंत समजले जाणारे लोकशाहीच्या नावाने मनमानी करताना निदर्शनास येते. भारत देश स्वतंत्र होऊनसुद्धा आपल्याच देशात राहून ‘गळय़ावर सुरी ठेवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही’  असा हलकल्लोळ व उन्मत्तपणा राजकीय स्वार्थापोटी जोपासताना पाहण्यात येतो, ही खंत आपल्याला स्वतंत्र भारतात अनुभवास येते. देशातच राहून देशविरोधी घोषणा देणाऱया व स्वतःला वैज्ञानिक युगात वावरणारे सुशिक्षित समजणाऱया युवकांना पैशांचे आमिष दाखवून, ‘ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी’  हा संदेश देशद्रोहय़ांकडून युवापिढीला दिला जात नाही ना, यावर विचार करण्याची आज गरज आहे. भारत देश हा अन्य देशांपेक्षा विशिष्ट आहे याचे एकमेव कारण म्हणजे विविधतेमध्ये एकता याच देशामध्ये प्रकर्षाने पहायला मिळते. हाच सुसंघटितपणा टिकून राहावा, देशामध्ये एकोपा नांदावा, सर्व स्तरावरील लोक संघटित होऊन देशाचे सुजाण नागरिक आहोत या संकल्पनेने वावरावेत, युवा पिढीला देशभक्तीचे योग्य मार्गदर्शन लाभावे उच्च विद्याविभूषित आणि देश व धर्माचे प्रतिनिधित्व करणाऱया दिग्गजांची भव्य सभा म्हणजे ‘वंदे मातरम्’  होय.

 मातृशक्तीचा सन्मान, युवकांची प्रेरणा, देशवासियांचा आवाज, हृदयातील हुंकार, देशभक्तांची धारणा, पू. सद्गुरुंचा संदेश म्हणजे ‘वंदे मातरम्’  होय. विद्वान अनुभवी राष्ट्रभक्तांचे विचार श्रवण करण्याची संधी यामध्ये प्राप्त होणार आहे. राष्ट्र आणि राष्ट्रधर्म या विचारांवर जीवनशैली निर्माण व्हावी, देशाची युवापिढी भविष्यातील दीपस्तंभ व्हावे, यासाठी सगळय़ा धर्मातील धर्ममार्तंड एकाच व्यासपीठावर राष्ट्रोत्थान्नाचा संकल्प करताना अनुभवास येणार आहे. ‘जियेंगे तो राष्ट्र के लिए और मरेंगे तो राष्ट्र के लिए’  हा युवकांचा गर्जनाकारी हुंकार संपूर्ण गोव्यात घुमणार आहे. वंदे मातरम् या घोषवाक्याने हजारो देशवासियांच्या अंतःकरणात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित होणार आहे. मातृभूमीसाठी योगदान देणाऱया दिग्गजांचा भव्य महागौरव होणार आहे. देशप्रेम जागृती, नीतीमूल्यांचे पालन, स्त्राrसशक्तीकरण, युवा प्रेरणा, निर्व्यसनी चारित्र्यसंपन्न युवा निर्मिती करण्यासाठी व राष्ट्रभक्ती प्रदर्शित करण्याच्या उदात्त हेतूने संघटित होण्यासाठी सर्वजण एकत्रित होत आहेत. जाती, धर्म, पंथ, संप्रदाय हा सर्व भेदभाव बाजूला सारून मानव धर्माचा पुरस्कार करण्यासाठी देशकार्य या सदराखाली सर्वांना एकत्रित येण्याची गरज आहे. विविध संस्था, राजकीय क्षेत्रातील दिग्गज, उद्योजक, कलाकार, दीड हजारहून अधिक सामाजिक व सांस्कृतिक संस्था गोव्यात राष्ट्रीयत्व प्रदर्शित करण्यासाठी एकत्रित होत आहेत. हा सोहळा गोव्याला राष्ट्रभक्त म्हणून जागतिक पातळीवर ओळख पटवून देण्याकरिता महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सर्व समाजाला हा कार्यक्रम लाभप्रद ठरेल यात तिळमात्रही शंका नाही. सद्गुरु युथ फेडरेशन तथा सत्गुरु फाऊंडेशनच्या या देशकार्यासाठी सलाम.

-वेदमूर्ती ज्ञानेश्वर पाटील,

तपोभूमी-गोवा

 

Related posts: